युवक पडून जखमी:आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून खड्डे बुजविण्याचा इशारा..

⚡सावंतवाडी, ता. ६-: चराठा-वझरवाडी येथून भोसले नॉलेज सिटीकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो विद्यार्थी व नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास माजगाव येथील २६ वर्षीय युवक खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कारला धडकला. या अपघातात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्ताला मदत केली.
या रस्त्यावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, अपघातग्रस्तांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधितांना वारंवार माहिती देऊनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रवी जाधव यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिमेंट-काँक्रिटचा वापर करून हे खड्डे बुजविण्यात येतील, असा इशारा रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.
