सेक्रेटरीपदी उमा परब; १ जुलै रोजी पदग्रहण सोहळा
⚡कणकवली ता.२८-: रोटरी क्लब सेंट्रल कणकवलीच्या १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीतील नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा नितीन बांदेकर तर सेक्रेटरी पदी सौ. उमा परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. भगवती मंगल कार्यालयात डिस्ट्रीक गव्हर्नर इलेक्टचे अध्यक्ष रो. नासीर बोरसादवाला यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवीन कार्यकारिणी महिला रोटरीयन यांची असून या वर्षभरात महिला सबलीकरणाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
कणकवली येथील साई पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रोटरी क्लबच्या पदाधिकार्यांनी ही माहिती दिली. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, माजी अध्यक्ष आणि असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, दादा कुडतरकर, नितीन बांदेकर, वर्षा बांदेकर, उमा परब, माधवी मुरकर, श्री. नाचणे, सौ. कांबळे आदी उपस्थित होते. रोटरी क्लब कणकवलीच्या नवीन कार्यकारिणी कोषाध्यक्षपदी सौ. माधवी मुरकर, उपाध्यक्षपदी स्नेहलता राणे, असिस्टंट गव्हर्नरपदी दीपक बेलवलकर यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळयावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , असिस्टंट गव्हर्नन नीता गोवेकर उपस्थित राहणार आहेत. या पदग्रहण सोहळयानिमित्त १ जुलै रोजी सायंकाळी ४ वा. पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या पदग्रहण सोहळयात न. पं. मध्ये उत्कृष्ट काम करणारा कर्मचारी, पोस्टमार्टम करणारा कर्मचारी यांचा तसेच डॉक्टर्स डे निमित्त रोटरीमधील सर्व डॉक्टरांचा सत्कार केला जाणार आहे.
२०२२-२३ या वर्षात ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यावर्षी रक्तदान शिबीर, कॅन्सर चेकअप, नेत्र चिकित्सा शिबीर, जयपूर फूट वाटप, नामांकित डॉक्टरांच्या टीममार्फत विविध आरोग्य तपासणी शिबीरे घेतली जाणार आहेत. तसेच रोड सेफ्टीसाठी रॅली व मार्गदर्शन, अवयवदान, नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. कुपोषित बालकांना प्रोटीन पावडरचे वाटप, एमएचएच कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रग्ज अवेअरनेस तसेच हॅपी स्कूल प्रोजेक्ट करण्याचा मानस आहे. तसेच यावर्षी कणकवलीमध्ये डायलेसिस सेंटर आणि ब्लड बँकेचा प्रोजेक्ट राबवणार असल्याचे वर्षा बांदेकर व अन्य पदाधिकार्यांनी सांगितले. रोटरीचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर तायशेटे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जवळपास ७० प्रोजेक्ट आपण वर्षभरात राबवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोटरी क्लबच्यावतीने कणकवली शहरामध्ये शुद्ध पेयजल, वॉटर एटीएम सुरु केले जाणार आहे. त्यासाठी दीड लाखाचा निधी मंजूर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक रुपयात एक लिटर पाणी देणारा हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे डॉ. तायशेटे यांनी सांगितले.
