⚡मालवण ता.२७-: मालवण चौके – कुडाळ मार्गावर धामापूर येथे डंपर आणि ट्रक मध्ये समोरासमोर धडक बसून आज सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन ट्रक चालक जखमी झाला. जखमी ट्रक चालकाला कुडाळ येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
मालवण चौके – कुडाळ मार्गावर धामापूर येथे कुडाळहुन चौकेच्या दिशेने जाणारा ट्रक (KA- 23
B- 4988) आणि चौके येथून चिरे वाहतूक करणारा डंपर (KA-19, D-5561) यांच्यात समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. आज सायंकाळी ६ वाजता हा अपघात झाला. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रसंगावधान राखून डंपर चालकाने बाजूला उडी मारल्याने त्याला दुखापत झाली नाही. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर केबिन मध्ये अडकलेला ट्रकचा चालक जखमी झाला असून स्थानिक तरुणांनी त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी कुडाळ येथे दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मालवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो. कॉ. सुनिल चव्हाण आणि सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आणि स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.
