Headlines

नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर…

हेत येथे साकारणार भव्य स्मारक:खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला भरघोस निधी..

⚡वैभववाडी ता.०३-: पद्मश्री, कविवर्य नारायण सुर्वे यांचे भव्य स्मारक वैभववाडी तालुक्यातील हेत येथे उभारण्यात येणार असून, या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी तब्बल 2 कोटी चा निधी मंजूर केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून हे स्मारक साकारले जाणार असल्याची माहिती भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य भालचंद्र साठे यांनी दिली.
हेत येथे कविवर्य नारायण सुर्वे यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जि. पं. सदस्य प्रमोद रावराणे, पं. स. सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, सरपंच कांचन कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भालचंद्र साठे म्हणाले, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे. वैभववाडी तालुक्यात त्यांनी स्वखर्चातून एडगाव येथे शहीद विजय साळसकर स्मारक उभारले आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यात महाराणा प्रतापसिंह कलादालन उभारण्यात आले आहे. थोर कवी नारायण सुर्वे यांचेही तालुक्यात भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा नारायण राणे यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी स्मारकासाठी पहिल्या टप्यात 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
हे स्मारक हेत गावातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये सुसज्ज सभागृह, वाचनालय तसेच नारायण सुर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्याचबरोबर सुर्वे यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट, त्यांचे साहित्य आणि सर्व कविता संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
परिसरातील विद्यार्थी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींसाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल. नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक वारशाचे जतन करण्याबरोबरच त्यांच्या साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी या स्मारकाचा उपयोग झाला पाहिजे. स्मारकाची देखभाल व जपणूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या माध्यमातून पुढील पिढीला साहित्याची नवी प्रेरणा मिळेल, असेही साठे यांनी सांगितले. स्मारकासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल हेतवासीय तसेच वैभववाडी तालुक्यातील नागरिकांकडून खासदार नारायण राणे व नाम. नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

You cannot copy content of this page