माती वाहून गेल्याने पडलेत मोठे खड्डे
जीवितहानी होण्याची शक्यता: नागरिक संतप्त
⚡बांदा ता.२७-: बांदा – दाणोली -आंबोली रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल समोर तिलारी पाटबंधारे विभागाच्या पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरातील माती वाहून गेल्याने याठिकाणी जीवघेणे भलेमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावर आडावा चर खोदल्याने भरावासाठी टाकलेली माती वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी चालकांना अपघात होऊन बरेच जण जखमी झाले आहे. तसेच पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकास पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात खड्डा हे पणं कळत नाही. यामुळे मोठ्या अपघातची शक्यता नाकारता येत नाही. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिकांतून उपस्थित होत आहे.
पावसापुर्वी रस्त्यांवर खोदाई करण्यात आल्यानंतर भरावा टाकून सिमे्ट क्रीक्रीटीकरण करणे गरजेचे होते. परंतु तिलारी पाटबंधारे पोटकालव्याच्या पाईप लाईनसाठी खोदाईनंतर फक्त माती टाकून चर बुजविण्यात आला. त्यानंतर रस्त्याची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे.
गोव्यातून आंबोली येथे वर्षा पर्यटनाला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. हजारो पर्यटक या रस्त्यावरुन प्रवास करतात. तसेच मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथून गोव्यात जाण्यासाठी याच मार्गाने प्रवास करतात. खड्डे पडलेल्या ठीकाणी दहाहून अधिक अपघात झाले असून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. येथे मोठी दुर्घटना उद्भवल्यास सर्वस्वी संबधित विभाग जबादार राहील असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
