सचिव देवयानी वरसकर: वार्षिक सभेत पदाधिकारी, कार्यकारिणी निवडी बिनविरोध
ओरोस ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी पुढील दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश तोरसकर यांची तर सचिव म्हणून देवयानी वरसकर यांची एकमुखी निवड करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश जेठे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार समितीचे अध्यक्ष गजानन नाईक, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर व अशोक करंबळेकर, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकुमार महाजन, मावळते सचिव उमेश तोरसकर, सहसचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, सदस्य बाळ खडपकर, सदस्य सुधीर राणे, रमेश जोगळे, विद्याधर केनवडेकर, एकनाथ पवार, आनंद लोके यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी पत्रकार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षभरातील कामकाजाची माहिती यावेळी मावळते सचिव उमेश तोरसकर यांनी वाचून दाखविली. तसेच खजिनदार संतोष सावंत यांनी वर्षभरात झालेला खर्च व शिल्लक वाचून दाखविली. याला सभागृहाने मान्यता दिली. त्यानंतर पुढील दोन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अण्णा केसरकर यांनी पदांच्या निवडीसाठी अनेक सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु संतोष वायंगणकर, गणेश जेठे व जेष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार बिनविरोध झालेल्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य निवडी यांच्या नावाचे वाचन केले. त्याला पूर्ण सभागृहाने एकमुखी मान्यता दिली. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी चालू आर्थिक वर्षापासून जिल्हा पत्रकार संघाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारात प्रत्येक तालुक्यातील एका सदस्याचा समावेश करण्याचा तसेच यासाठी आवश्यक तीन नावे तालुक्याकडून मागवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशी आहे नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष:- उमेश तोरसकर, उपाध्यक्ष:- बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, दाजी नाईक, रमेश जोगळे, खजीनदार:- संतोष सावंत, कार्यवाह:- देवयानी वरसकर, सहकार्यवाह:- महेश रावराणे, कार्यकारिणी सदस्य लखू खरवत दोडामार्ग, महेश सरनाईक मालवण, प्रकाश काळे वैभववाडी, दिपेश परब वेंगुर्ला, संतोष राऊळ कणकवली, हरिश्चंद्र पवार सावंतवाडी, राजेंद्र मुंबरकर देवगड, राजन नाईक कुडाळ.
