Headlines

गावातील प्रश्नांवर पोलीस पाटलांनी समन्वयाने काम करावे

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर

कणकवली : तालुक्यातील पोलीस पाटील व शांतता समितीची बैठक शुक्रवारी कणकवली पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस पाटलांनी गावातील विविध प्रश्नांवर पोलिसांशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव उपस्थित होते.

बैठकीत पोलीस अधीक्षक दहीकर यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि गावातील परिस्थिती जाणून घेतली. प्रत्येक पोलीस पाटलाने आपल्या गावातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि संवेदनशील विषयांची माहिती पोलिसांपर्यंत वेळेवर पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना
गावागावात फिरणाऱ्या परप्रांतीयांच्या वाहनांच्या कागदपत्रांची तसेच वाहन परवान्यांची तपासणी करण्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यानुसार संबंधित वाहनांची आवश्यक तपासणी करण्याच्या सूचना दहीकर यांनी पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांना दिल्या.

वारगाव-उंडिल तिठा येथील धाब्याजवळ अवजड वाहने थांबत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रश्नावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक दहीकर यांनी दिले.
मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर कारवाई
काही दुचाकींवर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरले जात असल्याचा मुद्दाही पोलीस पाटलांनी मांडला. अशा वाहनांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्याच्या सूचना दहीकर यांनी पोलिसांना दिल्या.

देवस्थानांच्या वादात देवाला ओढू नका
गावातील काही देवस्थाने अंतर्गत वादामुळे बंद असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावर दहीकर यांनी देवस्थाने सुरू राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. व्यक्तींमध्ये वाद असू शकतात; मात्र त्या वादामध्ये देवस्थान किंवा देवाला ओढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.पोलीस पाटलांनी गावातील व्यक्तींशी अनावश्यक वाद न ठेवता सर्वांचे गुण-दोष समजून घेऊन काम करावे. गावातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे, असेही दहीकर यांनी सांगितले.
वेतनाबाबतही केली सूचना
पोलीस पाटलांचे वेतन ऑनलाइन त्यांच्या खात्यावर जमा होते की नाही, याची प्रत्येकाने खात्री करावी, अशी सूचनाही पोलीस अधीक्षक दहीकर यांनी केली. प्रशासनाशी संबंधित अडचणी असल्यास त्या योग्य माध्यमातून मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.बैठकीच्या सुरुवातीला पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय सावंत आणि हेमंत सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांचे स्वागत केले. बैठकीत पोलीस पाटील आणि शांतता समिती सदस्यांनी स्थानिक प्रश्न मांडले. एपीआय गणेश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page