सत्यवान रेडकर यांचे संकल्प प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
⚡कणकवली ता.२६-: कुणाचीही बुद्धिमत्ता कोणत्यातरी एका परीक्षेतील गुणांवरून ठरत नाही. नापास होणं कमी टक्के पडणं म्हणजे तुम्ही जगण्यासाठी अपात्र आहात असे नाही. तुमची बुद्धिमता तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार ठरत असते. त्यामुळेच नववीत नापास झालेला माझ्यासारखा विद्यार्थी आज केंद्रशासनाच्या एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे. अशाच प्रकारे माझ्या जिल्ह्यातील आणि कोकणातील तरुण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सेवांत दिसून येतील, असे प्रतिपादन मुंबई सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी केले. संकल्प प्रतिष्ठान आयोजित तिमिरातून तेजाकडे या निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे १०४ वे व्याख्यान होते.
यावेळी सत्यवान रेडकर यांनी स्पर्धा परीक्षांचे प्रकार, त्याअंतर्गत भरली जाणारी पदे, अभ्यासक्रम, आवश्यक असणारी पात्रता, अभ्यासाची पद्धती याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोकणातील मुले दहावी, बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकावर असतात. मात्र या बुद्धिमत्तेचे पुढे काय होते? ही मुले प्रज्ञावंत नाहीत. केवळ गुणवंत आहेत. यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणातील मुले प्रशासकीय सेवेत येण्यासाठी त्यांना येथील ज्या व्यक्ती या परीक्षेत यशस्वी झाल्यात त्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपला गाव, तालुका, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गाव होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठीच मी तिमिरातून तेजाकडे या निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरातून तळमळ असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, असे सत्यवान रेडकर म्हणाले. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी स्पर्धा परिक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि कधीही मार्गदर्शन हवे असल्यास नक्की संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व ओळख संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरादअली शेख यांनी केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संकल्प प्रतिष्ठानचे सचिव अमोल भोगले यांनी केले. तर मनोगत सखाराम येंडे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल परब, श्रेयश शिंदे, अक्षय मोडक, आफताब शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरासाठी तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
