राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब
सावंतवाडी : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर केवळ सहानुभूती मिळविण्याकरिता बंडाचे खापर राष्ट्रवादीवर फोडण्यासाठी तसेच त्यांचा नाकर्ते पणा लपवण्यासाठी आमच्या नेत्यांवर टीका करून सत्य लपवित आहेत.
गेली अडीच वर्ष आमच्या नेत्यांबरोबर ही मंडळी सरकारमध्ये होती. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. दीपक केसरकर विनाकारण आमच्या नेत्यांवर टीका करत असतील तर जशास तस उत्तर देऊ असा इशारा कोकण विभाग राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रकाशित केल आहे.
यात त्या म्हणतात, शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलत असताना दीपक केसरकर आपली बाजू मांडत आहे. त्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, आपली बाजू मांडत असताना दीपक केसरकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीवर आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यामाध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. त्याचा तपशील आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गातील जनतेसमोर मांडू. आदरणीय अजितदादा यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांसाठी सिंधुरत्न योजना सुरू केली. ३०० कोटीचा निधी या योजनेतून २ जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. सिंधुरत्न योजनेचे अध्यक्षपद देखील त्यांनी दीपक केसरकर यांना दिल. रत्नागिरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार असताना हे पद ते त्यांना देऊ शकले असते. मात्र, तस न करता हे पद दीपक केसरकर यांना देण्यात आल. निधी वाटपात कोणताही अन्याय हा कोकणावर केलेला नाही. भूतकाळ विसरून त्यांनी केसरकर यांना भरघोस निधी दिला. त्यामुळे निधीवरून केसरकर करत असलेली टीका योग्य नाही. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. निधीची उपलब्धता देखील केली. परंतु, जागेच्या प्रश्नामुळे हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडल. हा प्रश्न सोडवण हे काम स्थानिक आमदार म्हणून केसरकर यांचं होत. हा प्रश्न स्थानिक ठिकाणी रखडून राहिल असून दीपक केसरकर करत असलेल्या टिकेमध्ये तसूभर देखील तथ्य नाही. शिंदेगटान केलेल्या बंडाच खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडण्याच काम ते करत आहेत. आमचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यावर केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी आणि स्वतःचा नाकर्तेपणा लावण्यासाठी टीका करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून महाविकास आघाडीचा धर्म आम्ही शेवटपर्यत पाळू. दीपक केसरकर यांनी आमच्या नेत्यांवर टीका करण बंद न केल्यास जशास तस उत्तर देऊ असा इशारा कोकण विभाग राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला आहे
