⚡मालवण ता.२५-: शिवसेना हे आमचे कुटुंब आहे. आज आम्ही विविध पदे ही शिवसेनेच्या जीवावरच भूषवित आहोत. शिवसेनेतून आमदार जातील, येतील. मात्र आम्ही नेहमीच शिवसेनेशी प्रामाणिक राहणार. आमचे नेतृत्व असणारे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक हे प्रलोभनांना न भुलता शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आहेत. मालवण तालुक्यातील आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेसोबत आहोत. पडत्या काळात संघर्ष करून शिवसेना वाढविण्याचे काम करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राज्यात शिवसेना पक्षात होत असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद घेऊन मालवण तालुका शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच यानंतर शाखेबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख संमेश परब, महिला उपजिल्हा संघटक सौ. सेजल परब, महिला तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, युवासेना उपतालुकाप्रमुख आतु फर्नांडिस, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, शिला गिरकर, आकांक्षा शीरपुटे, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, यशवंत गावकर, युवतीसेना आघाडीच्या निनाक्षी शिंदे, गौरव वेर्लेकर, प्रवीण लुडबे, नंदू गवंडी, दिलीप घारे, भगवान लुडबे, प्रसाद आडवणकर, पूजा तळाशीलकर, सौ. वायंगणकर, नंदा सारंग, अंजना सामंत, लक्ष्मी पेडणेकर, कांचन तारी, प्रिया धुरी, स्वप्नील आचरेकर, बंड्या सरमळकर, मनोज लुडबे, जयु लुडबे, लारा देसाई, सोमनाथ लांबोर, राजन लुडबे, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, सुहास वालावलकर, गणेश सातार्डेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या समवेत आमदार फुटल्याने आज शिवसेनेकडून आंदोलने होत आहेत. आम्हा शिवसैनिकांचे शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरील प्रेम अबाधित आहे. आज संकट काळातही शिवसैनिक एकमेकांच्या सोबत आहेत, शाखेत भेट देत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून, मतदार म्हणून आम्ही यापुढेही कार्यरत राहणार आहोत. शिवसेनेवरील आमची निष्ठा कायम आहे. जुने शिवसैनिक तसेच राणेंसोबत गेलेले जुने शिवसैनिकही विचारपूस करत आहेत. मालवण तालुक्यातील शिवसैनिक शिवसेनेशी प्रामाणिक असून कायम शिवसेनेसोबत आहेत, सर्वांना सोबत घेऊन पुन्हा ताकदीने शिवसेना वाढवू, संघर्ष करण्याची आमची तयारी असून भक्कमपणे लढा देऊ तसेच येणाऱ्या निवडणुका आम्ही जिंकू, असे हरी खोबरेकर म्हणाले.
आम्ही ज्या नेतृत्वाला निवडून दिले ते आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे खंबीरपणे नेतृत्व करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असले तरी आम. वैभव नाईक शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आहेत. प्रलोभनाला न भुलता आम. नाईक यांनी आमचा विश्वास सार्थकी लावला आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
यावेळी महिला आघाडीच्या सौ. पूनम चव्हाण यांनी आमदार फुटीचा प्रकार हे गलिच्छ राजकारण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे संयमी नेतृत्व असताना असा प्रकार होणे दुर्दैवाचे आहे. मालवण तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. अश्रू वाया जाऊ देणार नाही, विरोधकांना किंमत मोजायला लावू, असा इशारा सौ. चव्हाण यांनी दिला.
