Headlines

वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही नगरपालिकांना ‘वैकुंठ रथ’ देणार..

विशाल परब यांची घोषणा; ग्रामीण भागातील शववाहिनी अभावी होणारी गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न..

⚡सावंतवाडी, ता.०१-: ग्रामीण भागात शववाहिनी उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी अनेकदा नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शववाहिनी उपलब्ध न झाल्यास अन्य वाहनांची व्यवस्था करावी लागते आणि त्यासाठी नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही नगरपालिकांना ‘वैकुंठ रथ’ सुपूर्द करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी शववाहिनीअभावी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी योग्य वाहन उपलब्ध होणे ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक उत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही नगरपालिकांना वैकुंठ रथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा आजच करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वैकुंठ रथांमुळे संबंधित नगरपालिका क्षेत्रातील तसेच परिसरातील नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठी मदत मिळणार असून, मृतदेह सन्मानपूर्वक स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सामाजिक सेवेतून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.
“वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे विशाल परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page