मळगाव येथे स्वच्छ भारत व ग्रामीण जनजीवन मिशन अंतर्गत एक दिवसीय सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा संपन्न
⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-:: सरपंच विठ्ठलासारखा व गाव पंढरपूर सारखा असल्यास कोणतेही काम अडणार नाही, असा विश्वास पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांनी मळगाव येथे व्यक्त केला. भारत देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर गावाचा सरपंच व ग्रामसेवक हुशार बनायला हवा, असा सल्लाही त्यांनीउपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना दिला.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जनजीवन मिशन अंतर्गत आयोजित एक दिवसीय सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा या मळगाव येथील भगवती हाॅलमध्ये पार पडली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बोलत होते. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ या चार तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जलजीवन मिशन प्रतिनिधी युनिसेफ मुंबई मंदार साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग)
विनायक ठाकूर, सावंतवाडी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, दोडामार्ग गटविकास अधिकारी बेहेरे, वेंगुर्ले गटविकास अधिकारी सुतार, कुडाळ सहाय्यक गटविकास अधिकारी परब, दोडामार्ग सहाय्यक गटविकास अधिकारी जाधव तसेच सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. पेरेपाटील पुढे म्हणाले, कोणतीही माहिती ऐकीवात आल्यावर त्या माहितीची खात्री केली पाहिजे. गावातील प्रत्येक माणूस किमान 100 वर्षे जगला पाहिजे याचा विचार प्रत्येक सरपंचानी करायला हवा, आपल्या गावातील लोकांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळावे यासाठी पाण्याची व्यवस्था व नियोजन करायला हवे, शुद्ध हवेसाठी वृक्षारोपण करायला हवे. गावात किमान 20 हजार झाडे असावीत यासाठी वृक्षतोड थांबवावी,तसेच ग्रामस्वच्छता रहावी यासाठी गावात शौचालये निर्माण करावीत, खाद्य वस्तू जसे मसाले-तेल-दूध यांची भेसळ टाळाण्यासाठी दक्षता घ्यावी, गावातील प्रश्न गावपातळीवर सोडवावेत, सरपंच हा गावचा प्रमुख असतो व धनादेशावर सही करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना नसला तरी सरपंचाला असतो, त्यामुळे सरपंचाने चांगले निर्णय घ्यायला हवेत, स्वतः चे नियम ( जीआर)स्वतः तयार करावेत, पुढील सरपंचाना व ग्रामसेवक यांना काम करायला अडचणी येणार नाहीत असे काम करावे, सरपंचांनी आपल्या त्या अधिकारांचा योग्य वापर करुन गावाचा विकास करावा. ,गावातील कोणीही व्यक्ती सबसिडीवर अवलंबून राहू नये असे काम करावे,, ग्रामपंचायतीचे स्वतः चे उद्योग निर्माण करावेत, गावाच्या विकासाला व नुकसानीला ग्रामसेवक नव्हे तर सरपंचच जबाबदार असतो, त्यामुळे ती जबाबदारी चोख पार पाडावी, असे सांगितले.
विनायक ठाकूर यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सरपंच व ग्रामसेवका़ना या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली संधी निर्माण झाली आहे. सरपंचानी गावातील विकास कामांना चालना द्यावी असा सल्ला दिला. तसेच त्यांनी हा केंद्र सरकारचा कार्यक्रम असून प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लीटर पाणी देण्याचा संकल्प असल्याची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य.कार्य.अधिकारी प्रजित नायर यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना गावातील विकास योजनांना चालना देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माॅडेल गाव निर्माण करण्यासाठी आपला गाव विकसित करण्याचे ध्येय बाळगावे. उपस्थित सर्व सरपंचानी आपला गाव आदर्श बनविण्यासाठी लोकांमध्ये चळवळ निर्माण करावी, असे आवाहन केले. युनिसेफ चे प्रतिनिधी मंदार साठे यांनी जनजीवन मिशन अंतर्गत येत्या तीस वर्षात कुठेही पाणी टंचाई निर्माण होणार नाही याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी तसे ध्येय बाळगण्यात आले आहे. जनजीवन मिशनची ओळख करुन देताना प्रत्येक व्यक्तीला पुरेसे शुद्ध पाणी नियमितपणे देण्यासाठी वर्ष 2024 पर्यंत संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
जनजीवन मिशनची ओळख, वेगळेपणा व आवाका, अंतर्भुत घटक, नळपाणी पुरवठा सध्यस्थिती, पाणी पुरवठा नियोजन, ग्रामीण पाणी पुरवठा आव्हाने व उपाययोजना, नियोजन व टप्प्यातील उपक्रम, योजना आराखडे, मंजुऱ्या व कार्यादेश, अंमलबजावणी व टप्प्यातील उपक्रम आदी बाबतची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा कास नं.1 चे पदवीधर शिक्षक महेश पालव सर यांनी तर आभार प्रदर्शन विनायक ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच संघटनेच्या माध्यमातून भास्कर पेरेपाटील यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांना सुपारीचे रोप भेट म्हणून देण्यात आले. तसेच यावेळी महिला व पुरुष सरपंच प्रतिनिधीनी आपले मनोगत व कार्यक्रमा बद्दल आभार प्रदर्शन केले.
