आम.वैभव नाईक यांचा सवाल;माझी सुरक्षा काढून आम.दीपक केसरकर यांना द्या
⚡कणकवली ता.२५-: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सुरक्षा वाढवून द्यावी असे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. याकरिता जर पोलीस कमी पडले तर माझी असलेली सुरक्षा काढून केसरकर यांना द्यावी अशी देखील मागणी केली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.दीपक केसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही. मात्र आता सरकार बदलते म्हटल्यानंतर ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले असा टोला श्री नाईक यांनी लगावला.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम.वैभव नाईक बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक भूषण परुळेकर, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.
आम.वैभव नाईक म्हणाले,दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांची सुरक्षितता धोक्यात आलेली असते. असे केसरकर यांचे म्हणणे असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शांत आहे. बंडाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर किंवा अन्य ठिकाणी शिवसैनिकांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. दरवेळी पक्षांतर करताना केसरकर यांना सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित का करावा लागतो? याचं आत्मचिंतन केसरकर यांनी कराव. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना पाच वर्षे गृहराज्यमंत्री पद दिले होते. याचे भान केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना ठेवावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही सुरक्षा काढलेली नाही. व कुणाला सुरक्षा दिलेली नाही. राणेंचा दहशतवाद कुणी मोडून काढला आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. झेंडे घ्यायला कार्यकर्ते नसताना राणे यांच्या विरोधात कोणी उमेदवारी भरली हे देखील जनतेला माहिती आहे. अनेकदा केसरकर सांगताहेत की राणेंचा दहशतवाद मोडला. पण खरा दहशतवाद कोणी मोडला हे शिवसैनिक व जनतेला माहिती आहे. 2009 मध्ये माझा जीव धोक्यात घालून मी राणेंच्या विरोधात उमेदवारी भरली. त्या वेळी मला 50 हजार मते मिळाली. दोन वेळा माझा जीव वाचला होता. राणेंच्या गाड्या पाठलागावर होत्या. मात्र याचा आम्ही केव्हा बाऊ केला नाही. मी माझं हे मोठेपण यापूर्वीही सांगितलं नाही व यापुढेही सांगणार नाही. आता प्रश्न विचारला म्हणून सांगितले. असेही आम.नाईक म्हणाले. केसरकर यांचा दहशतवादाचा मुद्दा निवडणूक आली की सहा महिने अगोदर येतो. गेल्या अडीच वर्षात केसरकर यांना हा दहशतवाद दिसला नाही. मात्र आता सरकार बदलते म्हटल्यानंतर ते दहशतवादाच्या नावाने टाहो फोडू लागले असा टोला आम.वैभव नाईक यांनी लगावला.
