⚡सावंतवाडी ता.२५-: पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे जलजन्य आजार तसेच डासामुळे पसरणारे मलेरिया (हिवताप), डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने पिण्याचे पाणी गाळून, उकळून पिणे व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे, तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत डॉ. श्री. संदीप सावंत आवश्यक आहे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांनी केले आहे.
पावसाळ्यात पाणी साठे वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. मलेरिया (हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे आजार डासांमार्फत पसरतात. तीव्र ताप, तीव्र थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे या आजारामध्ये आढळून येतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित रक्त तपासणी करणे व औषधोपचार घेणे आवश्यक आहे. डासांची पैदास साठलेल्या व साठवलेल्या पाण्यात होते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे पाणीसाठे नष्ट करणे, साठलेले पाणी, डबकी वाहती करणे, साठलेल्या पाण्यात ऑईल टाकणे अथवा गप्पी मासे सोडणे तसेच भंगार साहित्य, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते असे पाणीसाठे नष्ट करावेत. मच्छरदाणीचा वापर करणे, खिडक्या, दारे, संडासचे व्हेंट पाईप यांना जाळी बसवणे आदी उपाययोजना कराव्यात व कोणतेही तापसदृश्य लक्षण असल्यास त्वरित उप जिल्हा रुणालय, सावंतवाडी येथे तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
