गोवा येथील विनायक नार्वेकर यांचे प्रतिपादन
⚡बांदा ता.२५-: शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय योजना व सातत्याने शेती पूरक उपक्रम राबविणाऱ्या बांदा सोसायटीचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार माशेल -गोवा येथील विकास सोसायटीचे चेअरमन विनायक नार्वेकर यांनी येथे काढले. बांदा सोसायटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी गोवा सोसायटीचे संचालक मंडळ अभ्यास दौऱ्यासाठी याठिकाणी आले होते.
त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बांदा सोसायटी चेअरमन घनश्याम बांदेकर, उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, संचालक संजय चांदेकर, लक्ष्मण जाधव, भिकाजी धुरी, कामिनी कुडव आदी उपस्थित होते. माशेल सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व संचालक यांचे बांदा सोसायटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात आली. आभार बाळू सावंत यांनी मानले.
