Headlines

एआयच्या युगातही शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे महत्त्व कायम

विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, संयम आणि सर्जनशीलतेला मिळते चालना : कलाशिक्षक बलराम सामंत

मालवण दि प्रतिनिधी :
महाराष्ट्रात सन १८८० पासून नियमितपणे घेण्यात येणाऱ्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांना आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIच्या युगातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या हाताला काम, बुद्धीला चालना आणि विचारांना आकार देण्याचे काम या प्रात्यक्षिकाधारित परीक्षांमधून होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या परीक्षा अत्यंत उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणेचे राज्य उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कलाशिक्षक बलराम गोविंद सामंत यांनी व्यक्त केले.

शासकीय एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २८ व २९ सप्टेंबर, तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यभर घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवरून सुमारे ७,६४४ विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ट झाले आहेत. राज्यात यावर्षी सुमारे ७ लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले आहेत.
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि कलाशिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी या परीक्षांचे आयोजन केले जाते. पूर्वी दहावीला अतिरिक्त गुणांची तरतूद नसतानाही राज्यात सुमारे चार लाख विद्यार्थी या परीक्षांना बसत होते. त्यामुळे या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा दृष्टिकोन काय असावा, तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात त्यांचे महत्त्व काय आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

AI चित्र तयार करू शकते; मात्र प्रत्यक्ष कौशल्य विद्यार्थ्यालाच आत्मसात करावे लागते
आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काही सेकंदांत कोणत्याही विषयाचे चित्र किंवा मजकूर तयार करता येतो. त्यामुळे ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे भविष्यातील महत्त्व काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र AI कितीही प्रगत झाले तरी प्रत्यक्ष हाताने चित्र काढण्याचे कौशल्य, एकाग्रता, संयम आणि सर्जनशील विचार विद्यार्थ्यालाच आत्मसात करावा लागतो, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

एखादा विद्यार्थी ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे तो दुसऱ्या दिवसापासून कलाकार होईल, अशी अपेक्षा या परीक्षांमागे नाही. मात्र अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, कला किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्याचे सर्वसामान्य ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकसित झालेले असणे आवश्यक आहे. त्यामध्ये कला शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांमुळे एकाग्रता आणि संयम वाढतो
आज अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे श्रम कमी होत आहेत. गणितातील उदाहरणाचे छायाचित्र काढून उत्तर मिळवणे किंवा कोणत्याही विषयाचा मजकूर AIच्या माध्यमातून तयार करून घेणे सहज शक्य झाले आहे. मात्र चित्रकलेत विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्वतःच चित्र काढावे लागते. त्याचप्रमाणे संगीत वाद्य वाजवण्यासाठीही प्रत्यक्ष सराव आवश्यक आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकावर आधारित परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी महत्त्वाच्या ठरतात. मुलांना सतत डिजिटल साधनांवर अवलंबून ठेवण्याऐवजी त्यांच्या हाताला काम आणि मनाला सर्जनशील दिशा देण्याची गरज आहे.
AIची मदत घ्या; मात्र प्रत्यक्ष कृती विद्यार्थ्यालाच करावी लागेल
आज AIच्या माध्यमातून माहिती, संदर्भ आणि ज्ञान सहज उपलब्ध होत असले तरी प्रत्यक्ष कृती विद्यार्थ्यालाच करावी लागणार आहे. ऑलिम्पिकसाठी कितीही माहिती संगणकाच्या माध्यमातून मिळाली, विक्रम समोर ठेवले गेले तरी मैदानावर धावायचे विद्यार्थ्यालाच आहे. त्याचप्रमाणे कला, संगीत, क्रीडा आणि अन्य प्रात्यक्षिक विषयांमध्ये प्रत्यक्ष कौशल्याला पर्याय नाही, असेही सामंत यांनी नमूद केले.
अति संगणक व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांची चर्चा जगभरात सुरू आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यापासून वाचविण्यासाठी प्रात्यक्षिक, सर्जनशील आणि अनुभवाधारित शिक्षण अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसोबतच त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासामध्ये कला शिक्षणाचे स्थान अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या सहज प्रवृत्तींचे उदात्तीकरण, सर्जनशीलता, सौंदर्यदृष्टी, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी कला शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला आणि कार्यानुभव या विषयांना महत्त्व देण्यात आले आहे.
मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञ कलाशिक्षकांची भरती आणि रिक्त पदे भरण्याबाबत ठोस धोरणाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कलाशिक्षकांच्या जागा वेळेत भरल्या गेल्या नाहीत, तर कला शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे

महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाला कलेची जाण आणि तज्ज्ञता असलेले कलासंचालक डॉ. किशोर इंगळे लाभले असून, कला शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्नांकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आशेने पाहत आहेत. या बदलासाठी सर्व घटकांचे सकारात्मक सहकार्य आवश्यक असल्याचे सामंत यांनी सांगितले.

शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षा अनादी काळापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षांकडे केवळ प्रमाणपत्र किंवा गुण मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सर्जनशील विकासाचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची गरज आहे.

कलाशिक्षकांची उपलब्धता याबाबत शासनाने प्रभावी धोरण राबविले, तर महाराष्ट्राची समृद्ध कला व संस्कृती पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जतन व संवर्धित होण्यास मदत होईल, असा विश्वास बलराम गोविंद सामंत यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page