Headlines

गणेशोत्सव नियोजनाचा बोजवारा; मालवणकरांना अंधार, वाहतूक कोंडी अन् असुविधांचा फटका!

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकरांचा सत्ताधाऱ्यांवर सडकून हल्लाबोल

मालवण (प्रतिनिधी)

गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या उत्सवाचे नियोजन करताना मालवण नगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी केला आहे. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, डास निर्मूलन तसेच बाजारपेठेतील नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असून सत्ताधाऱ्यांचे नियोजन हे केवळ कागदावरील बैठका आणि दिखाव्यापुरतेच मर्यादित राहिले, अशी टीका त्यांनी केली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या संख्येने नागरिक, भाविक आणि पर्यटक दाखल झाले असताना अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. जीर्ण वीजखांब, वीजवाहिन्यांवर वाढलेली झाडेझुडपे आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे नागरिक त्रस्त झाले. शासनाकडून आवश्यक साहित्य उपलब्ध करून न दिल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारावरही परिणाम होत असल्याचे आचरेकर यांनी म्हटले आहे.

शहर अंधारात अन् एलईडी खरेदीवर लाखोंचा खर्च?

गणेशोत्सवाचे अकरा दिवस उलटूनही शहरातील अनेक भागांत स्ट्रीटलाईटची समस्या कायम राहिल्याचे आचरेकर यांनी निदर्शनास आणले. प्रत्येक प्रभागात ३० ते ४० टक्के एलईडी दिवे बंद असल्याचा दावा त्यांनी केला. निकृष्ट दर्जाच्या एलईडी दिव्यांचा पुरवठा होत असल्याने दोन-तीन दिवसांतच दिवे बंद पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विशेष म्हणजे बाजारात चांगल्या दर्जाचे एलईडी दिवे ६०० ते ७०० रुपयांमध्ये उपलब्ध असताना नगरपालिका एका दिव्यासाठी सुमारे १३०० रुपये खर्च करत असल्याचा दावा आचरेकर यांनी केला. दिव्यांच्या खरेदीतच मोठी गडबड असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक नियोजन कागदावर; बाजारपेठेत कोंडी

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. वाहतूक नियोजनाची जबाबदारी होमगार्डवर सोपविण्यात आली; मात्र त्यांना आवश्यक अधिकार नसल्याने प्रत्यक्षात वाहतूक नियंत्रण प्रभावी ठरले नाही, असा आरोप आचरेकर यांनी केला.

नगरपालिका नियोजन बैठकीत बाजारपेठ, भंडारी हायस्कूल, विजय बेकरी, रिक्षा वाहतूक, नो-एंट्री आणि पार्किंगबाबत नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या नियोजनाचा फारसा उपयोग झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फॉगिंगचा धूर उडवला; डासांचा उपद्रव कायम!

शहरातील डास निर्मूलनाच्या उपाययोजनांवरही आचरेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी फॉगिंग मशीनचा धूर सोडून केवळ दिखावा करण्यात आला; मात्र प्रभावी डास निर्मूलन यंत्रणा नसल्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवासी संकुलांमध्ये सांडपाणी शुद्धीकरणाची प्रभावी यंत्रणा नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाढत्या नागरी वसाहतींच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फेरीवाले, व्यापारीही नियोजनाच्या फटक्यात

गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. त्यामुळे फेरीवाले, स्थानिक विक्रेते, महिला व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांसाठी योग्य नियोजन अपेक्षित होते. मात्र नो-एंट्री झोन, नो-पार्किंग, वाहनतळ आणि बाजारपेठेतील जागेबाबत करण्यात आलेले नियोजन प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविले गेले नाही, असा आरोप आचरेकर यांनी केला.

काही व्यावसायिकांनी मोठ्या आकाराची दुकाने उभारली असतानाही त्यांच्यासाठी रिमांडिंगच्या माध्यमातून जागा देण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी अधिकारी-कर्मचारी फिरकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

‘गणेशोत्सवाचे नियोजनच फसले!’

एकंदरीत गणेशोत्सवाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला असून जनतेमध्ये घोर निराशा निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने आपली विश्वासार्हता गमावली असून नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी टीका आचरेकर यांनी केली.

गणेशोत्सवापूर्वी बैठका घेऊन मोठमोठे नियोजन केल्याचे दाखविण्यात आले; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी परिस्थिती वेगळीच दिसून आली. त्यामुळे बैठका घेऊन फोटो काढण्यापेक्षा निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करा, असा टोला आचरेकर यांनी लगावला.

नगराध्यक्ष- मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त बैठक घ्यावी

शहरातील वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, बांधकाम, स्वच्छता आणि अन्य नागरी समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी आचरेकर यांनी केली. या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनाही सहभागी करून घेऊन समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

बॉक्स १ | एलईडी खरेदीवर आचरेकरांचा सवाल

बाजारात ६००-७०० रुपयांत दर्जेदार एलईडी; नगरपालिकेचा १३०० रुपयांचा खर्च कशासाठी?

मालवण शहरातील स्ट्रीटलाईटसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या एलईडी दिव्यांच्या दरावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. निकृष्ट दर्जाचे दिवे लावले जात असल्याने काही दिवसांतच ते बंद पडत असल्याचा त्यांचा आरोप आहे. बाजारात तुलनेने कमी किमतीत चांगल्या दर्जाचे दिवे उपलब्ध असताना नगरपालिकेकडून अधिक दराने खरेदी का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘बैठका खूप; अंमलबजावणी कुठे?’

नियोजनाच्या बैठका घेऊन उपयोग काय, जर प्रत्यक्ष रस्त्यावर त्याची अंमलबजावणीच होत नसेल?

गणेशोत्सवापूर्वी वाहतूक, पार्किंग, नो-एंट्री, बाजारपेठ आणि अन्य बाबींवर बैठका घेण्यात आल्या. मात्र उत्सवाच्या काळात प्रत्यक्ष परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप आचरेकर यांनी केला आहे. त्यामुळे कागदावरील नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील फरक प्रशासनाने तपासण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page