सेवा सप्ताहात महिला मोर्चा मालवण ग्रामीणतर्फे सेविका-मदतनीसांचा सन्मान; बालकांना खाऊ वाटप

मालवण दि प्रतिनिधी
बालकांच्या संगोपनापासून त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याला सलाम करत ‘सेवा सप्ताहा’अंतर्गत ‘आंगण का मिलन’ हा उपक्रम महिला मोर्चा मालवण ग्रामीणच्यावतीने तारकर्ली गावात राबविण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करून त्यांच्या सेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आल्याने बालचमूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी लुडबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा संयोजक पूजा वेरळकर, मालवण महिला तालुकाध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर तसेच समीक्षा खोबरेकर उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रामीण भागातील बालकांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देत असून त्यांच्या या कार्याची दखल घेणे ही समाजाचीही जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करत सन्मान करण्यात आला.
‘सेवा सप्ताहा’च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तालुकाध्यक्ष व वायंगणी गावच्या उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
