मोठे नुकसान: पोलीस, ग्रामस्थांनी आणली आग आटोक्यात
ओरोस ता २५
ओरोस ब्राम्हणवाडी येथे रात्री २ च्या सुमारास सुपर कॅरी सीएनजी टेम्पोला अचानक आग लागल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. टेम्पोला लागलेली आग घरातील विद्युत वायर पर्यंत पोहोचल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. पण नागरिकांनी मिळेल तिथले पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ओरोस ब्राम्हणवाडी महिंद्र परब यांच्या घराला लागून सुपर कॅरी टेम्पो उभा करून ठेवण्यात आला होता. हा टेम्पो सीएनजी होता. रात्री २ वाजण्याच्या सुमारास या टेम्पोने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच महिंद्र परब यांच्या आईने खिडकी उघडुन बाहेर पाहिले असता त्यांना टेम्पोला आग लागल्याचे निदर्शनास आले. या आगीने घराच्या विद्युत वाहिन्या सुद्धा पेटू लागल्या होत्या. हा प्रकार पाहताच महिंद्र यांच्या आईने आरडा ओरड केली. त्यानंतर अग्नी शमक बंब कार्यालयात फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.
आरडा ओरडा केल्यानंतर नजीकच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळ पाणी नव्हते. उपस्थित ग्रामस्थांनी मिळेल तिथून पाणी उपलब्ध करीत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान, पोलिसांना याबाबत कळविण्यात आले होते. यावेळी पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलीस पथकाने तात्काळ परब यांच्या घराजवळ धाव घेत घटनास्थळी दाखल झाले. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदू गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश्वर मुंढे यांचा यात समावेश होता. ग्रामस्थ, दाखल पोलीस व तेथील राजस्थानी कामगार मंगलाराम देवासी, हिंगुराम देवासी, भरलाल देवासी यांनी आग आटोक्यात आणली. आगीचा भडका मोठा असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही आटोक्यात आणण्यात आली आहे.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला सीएनजी टेम्पो
