फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी
⚡कणकवली ता.२३-: सामान्य ज्ञानाची तयारी स्वतः करावी लागते. नियमित वर्तमानपत्रे वाचली म्हणजे सामान्य ज्ञानाची तयारी नीट होते. रेडीमेड सामान्य ज्ञान धोका देते. एन.सी.आर.टीच्या सर्व पुस्तकांचे नोट्स वाचा.नोट्स स्वतः तयार केले पाहिजेत. जिद्दीने अभ्यास करत असताना आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे.ध्येय्याने झपाटलेली माणसेच आयुष्यात यशस्वी होतात. असे प्रतिपादन पंढरीनाथ राणे केले.
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी या विषयावर पंढरीनाथ राणे बोलत होते.
जीवनातील तकलादू आनंद आणि नकली प्रलोभनाला बळी पडू नका. सध्या स्पर्धा परीक्षेचे युग आहे. आणि या स्पर्धा परीक्षेत गणित विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे गणिताचा अभ्यास महत्त्वाचा असतो. गणिताचे एक सूत्र आहे जेवढा सराव तेवढ्या चुका कमी.असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा कृषी सभापती संदेश पटेल म्हणाले की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा पाया रचण्याचे हे दिवस आहेत. याच दिवसात आपल्याला शाश्वत काम केले पाहिजे. तरच आपण जीवनात यशस्वी होऊ. पंढरीनाथ राणे यांनी केलेले मार्गदर्शन फार मोलाचे आहे. ही सुरुवात आहे भविष्यात आपली गरज ओळखून आम्ही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सुरू करणार आहोत. या अल्लड वयात योग्य रस्ता पकडा यश तुमचेच आहे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनी केले तर आभार डॉ. राज ताडेराव यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
