प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी एक झाड लावण्याचा संकल्प करा. – श्रीकृष्ण परिट

⚡मालवण ता.२३-: प्रत्येकजण सावलीसाठी नेहमी झाड शोधतो त्यामुळे झाड लावून ते मोठ करणे ही सुध्दा प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाड फक्त लावून चालणार नाही तर लावलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करून ते झाड मोठे करणे ही सुध्दा आपलीच जबाबदारी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची होणारी कत्तल थांबली पाहिजे. वृक्षतोडीमुळे भविष्यातील धोके टाळायचे असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांने तसेच प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे ” असे आवाहन मालवणचे वनपरीमंडळ अधिकारी, श्री. श्रीकृष्ण परिट यांनी काळसे हायस्कूल येथे वृक्षारोपण प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे व ग्रामपंचायत काळसे यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ जून रोजी काळसे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना वनविभागातील नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा तसेच नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वनपरीमंडळ अधिकारी श्री. श्रीकृष्ण परिट यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हायस्कूल परिसरात वन अधिकारी श्री. परीट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत परब , उपाध्यक्ष योगेश राऊळ , सचिव तथा सरपंच केशव सावंत, सहसचिव गजानन प्रभू, खजिनदार दाजी परब , संचालक तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, निवृत्त तहसीलदार शरद गोसावी , राजन प्रभु , मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर , दिगंबर परब, पंढरीनाथ प्रभु, वन कर्मचारी अनिल परब , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनीही एक एक झाड लावले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षक राजेंद्र परब यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page