Headlines

सिंधुदुर्गात १५ दिवसांत १० हजार वनराई बंधारे उभारणार…

अणाव येथून विशेष पाणी संवर्धन मोहिमेला प्रारंभ:लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न..

⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर १’ अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेचा शुभारंभ अणाव येथे करण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाला पाणी संवर्धनाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात सुमारे ६ हजार ५०० कच्चे बंधारे उभारले जातात. मात्र, यंदाची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता सप्टेंबरअखेरपासूनच १० हजार वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रोटरी क्लब आणि सविता आश्रम यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविण्यासोबतच भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार आहे.
अणाव येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिरलेकर, कृषी अधिकारी संदेश परब, सविता आश्रमचे संदीप परब, रोटरी क्लबचे सेक्रेटरी राकेश म्हडदळकर, अभिषेक माने, राजीव पवार आणि अणावचे सरपंच लीलाधर आणावकर यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून पाण्याचा साठा वाढवून आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page