Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका): चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय, बचाव व मदतकार्याची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या संयुक्त सहभागातून १ ऑक्टोबर २०२६ रोजी बहुराज्यीय रंगीत तालीम आयोजित होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील तारकर्ली व आचरा, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, श्रीरामवाडी व शेळपी, तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग व तांबळडेग या सात ठिकाणी विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सहभागातून ही तालीम होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात विशेष बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाला जिल्ह्यातील तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.

या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार आदित्य कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे आपत्ती व्यवस्थापन समन्वयक श्री.बालाजी व्हरकट, वित्तीय व्यवस्थापन सल्लागार श्री.सागर वळंजू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, जिल्हास्तरीय खातेप्रमुख, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्हा हा आपत्तीप्रवण जिल्हा असून येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हवामान विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समन्वयाने काम करतात. रंगीत तालीम यशस्वी करण्यासाठी सहभागी यंत्रणांची उपस्थिती, परस्पर समन्वय आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त सहभाग वाढवून पूर्ण क्षमतेने ही तालीम यशस्वी करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनातील यंत्रणांना दिले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार आदित्य कुमार यांनी तयारीबाबत आवश्यक मार्गदर्शक मुद्दे मांडले. तसेच दुपारी त्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिली. तसेच तालीम ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. त्या ठिकाणी ‘इन्सिडेंट कमांड पोस्ट’, ‘स्टेजींग एरिया’, ‘रिलीफ कॅम्प’, ‘मेडिकल एड पोस्ट’ आदी आपत्ती प्रतिसाद सुविधांची तयारी, मनुष्यबळ व साधनसामग्रीचे नियोजन, तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार आहे.

काल्पनिक आपत्तीची परिस्थिती

या रंगीत तालमीसाठी चक्रीवादळाची तीव्र परिस्थिती गृहीत धरण्यात आली आहे. यात किनारी, खाडी व नदीमुख परिसरात समुद्राचे पाणी सुमारे तीन मीटरपर्यंत वाढणे तसेच २४ ते ३६ तासांच्या कालावधीत १७५ ते २०० मिलिमीटर पर्जन्यमान यांसारख्या काल्पनिक आपत्ती परिस्थितीचा सरावासाठी समावेश आहे. या परिस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचावकार्य, मच्छीमार व नौकांची सुरक्षितता, वैद्यकीय मदत, निवारा केंद्रांचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, वीज व दूरसंचार यांसारख्या अत्यावश्यक सेवांचे व्यवस्थापन, तसेच विविध यंत्रणांमधील समन्वयाची चाचणी घेण्यात येणार आहे.

नागरिकांना प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

ही रंगीत तालीम प्रत्यक्ष चक्रीवादळाची पूर्वसूचना नसून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी आयोजित केलेला एक सराव आहे. तालमीदरम्यान घटनास्थळी बचाव पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस यंत्रणा, बोटी किंवा अन्य आपत्कालीन साधनसामग्रीची हालचाल होणार आहे. रंगीत तालमीसंदर्भातील अधिकृत माहिती केवळ प्रशासनाच्या माध्यमातून प्रसारित केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

चक्रीवादळासारख्या आपत्तीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित ठेवणे, वेळेत स्थलांतर करणे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहकार्यपूर्ण सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी रंगीत तालमीदरम्यान प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अन्य यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

या अनुषंगाने काही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग च्या (०२३६२)२२८८४७ आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत करण्यात येत आहे.

00000

You cannot copy content of this page