Headlines

झोळंबेचे डाकपाल कार्तिक जारवाल यांचा डाक विभागातर्फे विशेष सन्मान…

⚡बांदा ता.२९-: ग्रामीण भागात उत्कृष्ट सेवा बजावत विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना डाक विभागाच्या सेवांशी जोडल्याबद्दल झोळंबे शाखेचे डाकपाल कार्तिक गिरजाराम जारवाल यांचा भारतीय डाक विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
भारतीय डाक विभागातर्फे आयोजित ग्रामीण डाक सेवकांच्या संमेलनात हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते कार्तिक जारवाल यांना गौरविण्यात आले. यावेळी पणजी गोवा येथील डाक सेवा निदेशक रमेश पाटील तसेच सुप्रिटेंडंट पोस्ट अधिकारी नंदकुमार कुर्लपकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या आर्थिक वर्षात कार्तिक जारवाल यांनी तब्बल १२०० नवीन खाती सुरू केली. तसेच तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पीएलआय (PLI) जीवन विमा व्यवसाय केले. याशिवाय ४० अपघाती विमा काढून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत डाक विभागातर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मानानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्तिक जारवाल म्हणाले, “या सन्मानाचे श्रेय झोळंबे गावातील सर्व नागरिकांचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न राहील.”
कार्तिक जारवाल यांच्या या सन्मानाबद्दल झोळंबे गावातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
फोटो:-
दिल्ली येथे डाकपाल कार्तिक गिरजाराम जारवाल यांचा भारतीय डाक विभागातर्फे विशेष सन्मान करताना मान्यवर.

You cannot copy content of this page