८२ हजार रक्कम असलेली पिशवी प्रामाणिकपणे केली परत

निवृत्त पोलीस अधिकारी शरद राऊत यांचा आशिये येथे सत्कार

⚡कणकवली ता.२३-: रस्त्यात पडलेली मिळालेली ८२ हजाराची रोकड प्रामाणिकपणे परत करण्याची घटना कणकवलीनजीक आशिये येथे घडली. ही रक्कम परत करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी शरद राऊत यांचा आशिये रहिवासियांनी सत्कारही केला.

आशिये येथीलच परशुराम उर्फ मधू बावकर हे छोट्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात होते. त्याचवेळी पाऊस आल्याने त्यांनी मुलाला चारचाकीने शाळेत सोडण्याचा निर्णय घेतला. या घाईगडबडीत त्यांनी आपल्या हातातील ८२ हजाराची रोख रक्कम असलेली पिशवी कारच्या टपावर ठेवली. त्यानंतर ते कार सुरू करून शाळेत जायला गेले. विशेष म्हणजे श्री. बावकर यांनी गाडीच्या टपावर काहीतरी ठेवताना तेथीलच शरद राऊत यांनी पाहिले होते.

श्री. बांवकर हे शाळेत जात असताना वाटेत ही रोकड असलेली पिशवी टपावरून रस्त्यात पडली. त्यानंतर श्री. राऊत हे त्याच रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना रस्त्यात पिशवी आढळून आली. त्यांनी अंदाजाने ही पिशवी श्री. बांवकर यांच्या गाडीवरून पडलेली असल्याचा अंदाज बांधून ती आपल्याकडे घेतली.काहीवेळाने श्री. बांवकर यांना आपण पैशाची पिशवी गाडीच्या टपावर ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवून पाहणी केली असता पिशवी आढळली नाही. हवालदिल झालेल्या श्री. बांवकर यांनी माघारी फिरून वाटेत कोठे पिशवी पडली का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र पिशवी कोठेही आढळून येत नव्हती. त्याचवेळी वाटेत श्री. राऊत यांना शोधाशोध करणारे बांवकर दिसले असता त्यांनी काय शोधताय’ याबाबत विचारणा केली. त्यानंतर घटना समजल्यावर राऊत यांनी त्याची पैशाची पिशवी त्यांना देऊ करत रस्त्यात सापडल्याचे सांगितले. एवढ्या रकमेची पिशवी प्रामाणिकपणे परत करणाऱ्या श्री. राऊत यांचे आशिये पूर्णानंदनगर – येथील रहिवासियांनी कौतूक केलेच, त्याशिवाय त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कारही केला. यावेळी विजय मसुरकर, योगेश कोदे, भरत काणेकर, रामचंद्र कुबल, सानिका कोदे, जयवंत गावडे, अरुण राणे, सुषमा राऊत, ऋषीकेश ठाकुर, प्रगती बांवकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page