ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
⚡सावंतवाडी ता.१९सहदेव राऊळ-: मळेवाड येथील नदीपात्रात पुलानजीक आज मगरीचे वास्तव्य असल्याचे परत एकदा निदर्शनास आले. मुरकरवाडी येथील ग्रामस्थ अतुल मुरकर, विश्वास चराटकर, विनय जाधव, सप्नाली जाधव यांना ही मगर दृष्टीस पडली. बऱ्याच वेळ ही मगर या नदीपात्रात होती.
मात्र त्यानंतर ती पाण्यात उडी मारून दुसरीकडे गेली, अशा या घटना रोजच येथील शेतकरी, ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत असतात. त्यामुळे येथील शेतकरी, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील नदी पात्राच्या बाजूने बऱ्याच जणांची शेती आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा शेतीच्या कामात व्यस्त आहेत.
येथील जवळपास असलेल्या वाड्यातील ग्रामस्थांची नदीच्या पात्राच्या बाजूला शेती असल्यामुळे त्यांची सतत या नदीकिनारी ये -जा असते. त्यातच चराटकरवाडी, मुरकरवाडीतील ग्रामस्थांना या मगरी सतत दृष्टीस पडत आहेत. अशामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीमुळे एखादी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे याची दखल वनविभागाने तात्काळ घेऊन या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
