मालवणात तीन बंद घरे चोरट्यांनी काल मध्यरात्री फोडली…

मालवण शहरात खळबळ

⚡मालवण ता.१७-: मालवण शहरात काल मध्यरात्री तीन बंद घरे अज्ञात चोरट्यानी फोडून चोरी केल्याची घटना घडली असून भर वस्तीतील घरे चोरट्यानी लक्ष्य केल्याने मालवणात खळबळ उडाली आहे. या तिन्ही घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेल्याचा फायदा उठवीत चोरट्यानी या घरांवर डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अधिक तपासासाठी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.

मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया नजीकच्या राजन नेवगी यांचे बंद घर चोरट्यानी फोडत कपाटे फोडून रोख रक्कम व इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. नेवगी कुटुंबीय घर बंद करून कोल्हापूर येथे गेले असून याचा फायदा चोरट्यानी उठवला. तर बंदर जेटी रोड वरील पालव – वारीशे यांच्या घराचे कुलूप फोडून चोरट्यानी डल्ला मारला आहे. या घराच्या शेजारी रात्री कुत्रे भूकंत असल्याचा आवाज ऐकून शेजारील कुटुंबियांना रात्री २ वाजता जाग आल्यावर त्यांना एक अज्ञात व्यक्ती पळून जाताना दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर मेढा येथील राम मंदिर समोरील महेश परब यांचे बंद घरही चोरट्यानी फोडून काही रोख रक्कम लंपास केली. परब कुटुंबीय हे कुंभारमाठ येथे राहावयास असल्याने त्याचा फायदा चोरट्यानी घेतला.

दरम्यान या घरफोडीच्या घटनांनंतर मालवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस श्री. शिवगण, श्री. टेम्बुलकर, पोलीस पाटील श्री. बावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page