मालवण : (प्रतिनिधी)
मालवण- महान मार्गावरील आडारी – खैदा घाटी येथे गुरुवारी रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक सुनील मलये (रा. खैदा) यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मलये हे आपल्या रिक्षाने मालवण येथून खैदा येथे आपल्या घरी जात होते. खैदा येथील ओवळ या ठिकाणी यांच्या रिक्षा समोर माकड आडवा आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाल्याचे समजताच त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक मंदार केणि, अनिल न्हिवेकर, पप्या कांबळी, संजय कांबळी, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, यासह स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मलये यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथूनही त्यांना गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले. सध्या गोवा बांबूळी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
