⚡कणकवली ता.१०-: पावसाला सुरुवात होताच अपघाताची मालिका सुरू झाली आहे.देवगड- निपाणी मार्गावर कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात घडला असून या अपघातात डंपर चालक केबिनमध्ये अडकला. डंपर चालकाच्या सुटकेसाठी पोलीस कर्मचारी, एसटी कर्मचारी, तसेच ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
याबाबत माहिती अशी कि बसचालक महेश रघुनाथ अतिग्रे हे पुणे- देवगड (एम. एच २० बीएल ४०७९) हि बस घेऊन देवगडकडे जात होते. यावेळी सदर एसटीची कणकवलीकडे येणाऱ्या डंपरला (एम. एच ०७ सी ६२३७) समोरून धडक बसली. हि धडक एवढी जोरदार होती कि डंपरचे केबिन मोडून डंपर चालक केबिनमध्ये अडकून पडला. तर एसटीच्या मागाहून येणाऱ्या छोटा टेम्पोची एसटीला मागाहून धडक बसली. घटनास्थळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, एसटी विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ, विभागीय वाहतुक अधिकारी मोहनदास खराडे तसेच पोलीस कर्मचारी, एसटी कर्मचारी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. एसटीतील प्रवाशांना शिरगाव आणि कणकवली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
