सतीश सावंत यांचा टोला; टोल कंपनीच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त
⚡कणकवली ता.१०-: आम.नितेश राणे हे टोल माफी मिळणारच असे सांगत आहेत. तर त्यांचे वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे हे टोलमाफीसाठी प्रयत्नशील राहू असे सांगत आहेत. त्यामुळे टोलच्या मुद्द्यावर राणे कुटुंबियांनी प्रथम एकमत करावे आणि नंतरच बोलावे असा टोला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे.हैद्राबाद येथील कंपनीला टोलचे कंत्राट मिळाले आहे. मात्र या कंपनीच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे हे इथली जनताच शोधून काढेल असेही जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
कणकवली येथील शिवसेना कार्यालयात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले ,युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके ,संभाजी रावराणे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, टोलचे टेंडर जिल्ह्यातील व्यक्तीला मिळणे अथवा राज्याबाहेरील कंपनीला मिळणे याबाबी टेंडर प्रक्रियेवेळी निश्चित होतात. मात्र हैद्राबादच्या कंपनीला ठेका मिळतो, या कंपनीला कुणाचा राजकीय पाठिंबा आहे हे आता इथली जनताच शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. खरे तर सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी मिळायलाच हवी अशी खासदार विनायक राऊत यांच्यासह संपूर्ण जिल्हावासीयांची मागणी आहे.जर जिल्ह्यातील लोकांनी टेंडर भरलं असेल तर त्यात चुकीचे काय?हैदराबाद येथील कंपनी इथे काम करते. मग जिल्ह्यातील लोकांना रोजगार भेटला असता,आता टेंडर पेक्षा आम्हाला टोल माफी मिळावी,ही आमची भूमिका असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळावी ,ही शिवसेनेची भूमिका आहे.ज्यावेळी संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली टोल विरोधी आंदोलन शिवसेनेने केले.त्यावेळी आ.नितेश राणे यांनी टोलमाफी नारायण राणे यांच्या माध्यमातून होईल,आंदोलने करण्याची गरज नाही,असे म्हटले होते.मात्र,काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोलमाफी देणं शक्य नाही,जिल्हापूरता वेगळा निर्णय होणे अशक्य आहे,असे जाहीर केले.त्यामुळे आ.नितेश राणे व नारायण राणे यांनी टोलबाबत कुटूंबात एकमत करावे,असा टोला शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झालीच पाहिजे, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारणार असा इशारा त्यांनी दिला आहे.
या टोलचा सर्वाधिक फटका कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्याला बसणार आहे. मुख्यालयात जा-ये करण्यासाठी दररोज शेकडो रुपये मोजावे लागतील. त्यामुळे ही टोलमाफी व्हावी अशी आमची भूमिका आहे. जर कोल्हापूरच्या नागरिकांना टोल माफी मिळत असेल तर सिंधुदुर्गातील जनतेला टोल माफी का नाही. या मागे कोण राजकारण करत आहे. हे लवकरच कळेल असे ही श्री. सावंत म्हणाले.
