कर्मचारी संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा घेतला निर्णय
कणकवली : देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाच्या प्रश्नावर पालकमंत्री यांनी ठाम भूमिका घेत, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवगड येथे झालेल्या बीएलओ प्रशिक्षणावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ कर्मचारी संघटना राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे आणि कर्मचारी समन्वय समितीच्या शिष्टमंडळामध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी, कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही. अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. सिंधुदुर्गातील जनता आणि कर्मचारी हे माझे कुटुंब असून त्यांच्या सन्मानाशी तडजोड होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
तसेच, या प्रकरणी महसूलमंत्र्यांशी चर्चा करून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या बदलीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्यास कर्मचारी समन्वय समितीने थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचारी समन्वय समितीने पुढील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीएलओ आणि SIR हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने ते नियोजित मुदतीत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही कर्मचारी संघटनांनी मान्य केले.
समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी हा निर्णय सिंधुदुर्गातील कर्मचारी संघटनांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. सकारात्मक हस्तक्षेप केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना, पत्रकार व माध्यमांचे त्यांनी आभार मानले.
या बैठकीला राज्य कर्मचारी समन्वय समितीचे राज्य नेते सखाराम सकपाळ, सचिव सत्यवान माळवे, नरसू रेडकर, वामन तर्फे, दिनेश म्हाडगुत, सुहास सावंत, संदीप कदम, राजू वजराटकर, जगदीश गोगटे, जयेंद्र चव्हाण, सचिन मदने, संदीप मिराशी, निकिता ठाकूर, सोमनाथ शेंगाळ, लक्ष्मण वळवी, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, टोनी म्हापसेकर, हनुमंत वाळके, सुभाष गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
