कुडाळ : सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीने लहान मुलांसाठी आयोजित करण्यात कॅरम आणि बुद्धिबळ खेळाच्या प्रशिक्षण शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ शहर आणि तालुक्यातून आलेल्या मुलांनी कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक धडे गिरवले.
कॅरम आणि बुद्धिबळ या खेळाची लहान मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी सावंतवाडी येथील मुक्ताई अकादमीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. यावेळी कुडाळ शहरात पहिल्यांदाच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन शहरातील ज्येष्ठ क्रीडाप्रेमी काका कुडाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्ताई अकादमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर, आर एल परब सर, विभावरी पालव, सीए श्रीमती वालावलकर, उन्मेष शेट्ये, केंद्रप्रमुख श्री. वारंग सर, अनंत राणे, गुरुप्रसाद सावंत, मार्गदर्शक मयुरेश मालवणकर, श्री. राऊळ सर उपस्थित होते.
यावेळी बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई अकादमीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जी मुले खेळाकडे ओढली जातील त्यांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन त्यांनी पालकांना केले. कमी वयात मुले बुद्धिबळ आणि कॅरम मध्ये मोठं यश मिळवत आहेत. त्यामुळे मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताई अकादमी आणि संचालक कौस्तुभ पेडणेकर जे प्रयत्न करताहेत त्याच कौतुक असलयाचे श्री. कुडाळकर यांनी सांगितले.
यावेळी बुद्धिबळ खेळाविषयी मयुरेश मालवणकर यांनी तर कॅरम खेळाविषयी कौस्तुभ पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राऊळ सर यांनी केले. या कार्यक्रमाला खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुक्ताई अकादमीच्या कॅरम-बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
