वेंगुर्ला ता.०१-:* मोदी सरकारने सत्तेवर आल्या-आल्या विविध कल्याणकारी योजनांचा झपाट्याने प्रारंभ केला. या योजना प्रामुख्याने गोरगरीब, महिला, मध्यम वर्ग, छोटे शेतकरी, कामगार, मजुर, कष्टकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या. या योजनांचे लाभ थेट गरजू वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने थेट हस्तांतरण प्रक्रिया पद्धतशीरपणे कार्यान्वीत केली. त्यामुळे थेट लाभाच्या योजनेचा पैसा गोरगरिबांच्या खात्यात जमा झाला. अशा योजनांचा जास्तीत जास्त फायदा शेतक-यांना मिळण्यासाठी ‘‘शिवार बैठकांच्या‘‘ माध्यमातून किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपाचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले.
पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून या आठ वर्षांत देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या, म्हणूनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग किसानमोर्चाच्यावतीने जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांचा शुभारंभ वेंगुर्ला तालुक्यातील खानोली गावामध्ये आंबाबागेत शेतक-यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी भाजपाचे किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना देसाई, किसान मोर्चाचे सल्लागार बाळा सावंत, सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळू प्रभू, महिला जिल्हा संयोजिका दिपा काळे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ केळुसकर, जिल्हा चिटणिस अजय सावंत, मालवण मंडल अध्यक्ष महेश सारंग, ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, तालुका सदस्य सुनील घाग, प्रगतशील शेतकरी प्रकाश झेंडे, शेतकरी मित्र महादेव नाईक, पोल्ट्री व्यावसायीक सत्यवान पालव, महेश मेस्त्री, महेश सावंत, शैलेश जामदार, सौरभ नाईक, मानसी मेस्त्री आदी किसान मोर्चा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
या शिवार बैठकीत शेतक-यांना शेतकरी सन्मान नीधी, पिक विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, किसान रेल, शेतकरी उत्पादक संघटना, मृदा आरोग्य कार्ड, सौर सुजला, ग्राम सिंचाई, ई-नाम, किसान सुविधा अॅप इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली. संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी पी.एम.किसान सन्मान योजना जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते किसान मोर्चाचे जिल्ह्याचे संयोजक उमेश सावंत यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथे आयोजित गरीब कल्याण संमेलनाच्या व्यासपीठावरुन देशातील १०.५० कोटी शेतक-यांना मोठी भेट दिली. त्यांनी पी.एम.किसान सन्मान निधीचा अकरावा हप्ता जारी केला. या अंतर्गत शेतक-यांच्या बँक खात्यात २१ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले.याबद्दल किसान मोर्चा-सिंधुदुर्गच्यावतीने पंतपधान मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव शिवार बैठकीत घेण्यात आला.
