तीव्र आंदोलन छेडण्याचा उपसरपंच दत्ताराम खरात यांचा इशारा
कणकवली ता.३१-:* कणकवली तालुक्यातील नाटळ गावामध्ये अद्याप एकही एस. टी. चालू झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी ३१ मे रोजी कणकवली एसटी आगारात धडक देत उपसरपंच दत्ताराम खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख यादव यांना निवेदन दिले .
या वेळी उपसरपंच दत्ताराम खरात , नाटळ सोसायटी चेअरमन एन. बी. सावंत , संचालक मिलिंद सावंत ,माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सावंत , संजय खरात , कुणाल आळवे ,प्रमोद शिरसाठ , निलेश गावकर , भाई गावकर , भाऊ पाताडे , ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .
निवेदनात म्हटले आहे की , कोरोनामुळे व एसटी संपामुळे सुमारे पाच ते सहा महिने गावातील एसटी वाहतूक पूर्ण पणे बंद होती . अद्यापही विद्यार्थी , नोकरवर्ग तसेच आजारी व्यक्तीला नियोजित ठिकाणी जाण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत तसेच मानसिक व शारीरिक त्रासाला ही सर्वसामान्य ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे .कनेडी ते नाटळ थोरले मोहूळ , धाकटे मोहूळ हे सुमारे ९ किलो मीटरचे अंतर आहे . दीड हजार लोकवस्ती असलेल्या या अवघ्या दोन वाडी मध्ये एकही दळणवळनाचे साधन नसल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे . कोरोनानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिक ठिकाणी एसटी धावू लागल्या परंतु विस्थाराने तालुक्यातील दोन नंबरवर असलेल्या नाटळ मध्ये अद्यापही एसटी नजरेस पडत नव्हती .
या बाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाकडून ठेंगा दाखविण्यात येत होता . एसटी महामंडळाने केलेल्या सर्व अटी शर्तींची ताबडतोब ग्रामपंचायती च्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली तरीही एसटी चालू करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली होऊ शकल्या नाहीत सर्व जैसेथे .शेवटी मंगळवारी संतप्त ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी एसटी आगार व्यवस्थापक कार्यालयावर धडक देत आगार व्यवस्थापक यादव यांना निवेदन दिले .तसेच दोन दिवसात नाटळ मधील सर्व एसटी फेऱ्या नियमित चालू झाल्या पाहिजेत अन्यथा सर्व ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसरपंच दत्ताराम खरात यांनी यावेळी दिला .
