मालवण दि प्रतिनिधी बिळवस ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उदघाटन नुकतेच झाले असले, तरी या इमारतीचे बांधकाम हे योग्य कागदपत्रांच्या आधारावरती न केल्याने आणि बिळवस – आंगणेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरवून दिलेल्या जागेवर न केल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या इमारतीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, इमारत बिळवस गावात नेण्याच्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सहकार्य करून प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करीत असून असहकार पुकारून या आर्थिक वर्षापासून घरपट्टी न भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. आंगणेवाडी – बिळवस – भोगलेवाडी या तीन गावांची मिळून ‘बिळवस ग्रामपंचायत’ या नावाने अंतराच्या निकषांवर आधारित स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला. विकासकामे तर दूरच परंतु मूलभूत सुविधा – रस्ते पाणी आणि वीज या बाबतीतही प्रगती शून्य आहे. या तीन वर्षांत विद्यमान सरपंचांनी काही ग्रामपंचायत सदस्य आणि आंगणेवाडी, भोगलेवाडी ग्रामस्थांची दिशाभूल केली.
आंगणेवाडी – भोगलेवाडी या दोन गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता तीनही गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी ठरविलेली पूर्वनियोजित जागा बेकायदेशीररित्या बदलून ती इमारत बिळवस गावात नेली. स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा मूळ उद्देशच पार धुळीला मिळविला. हे शक्य झाले ते शासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे विसरून चालणार नाही, असा आरोप आंगणेवाडी आणि भोगलेवाडीच्या ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
