स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांच्या सहभागाशिवाय किनारा टेहळणी पथक काय कामाचे – बाबा मोंडकर

मालवण ता.२८-:* तारकर्ली येथील बोट दुर्घटनेनंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाची बैठक घेऊन किनाऱ्यांवर टेहळणी पथक नेमण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकाच्या सहभागाशिवाय किनारा टेहळणी पथक काय कामाचे ? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सागरी क्रीडा व्यवसायावर लक्ष देण्यासाठी टेहळणी पथक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये अनेक शासकीय खात्यांच्या अधिकारी वर्गाचा समावेश करण्यात आला आहे.

परंतु यामध्ये सागरी पर्यंटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा, व्यक्तीचा समावेशच नसल्यामुळे या पथकांचा उद्धेशच सफल होणार नाही. हा निर्णय घेताना स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते, असे बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटन प्रकारातील सुरक्षेची जबाबदारी कुठल्याही शासकीय यंत्रणेने आज पर्यंत पार पाडलेली नाही. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून शासनाने गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये शासकीय कर घेऊन त्याबदल्यात पर्यटक व या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सुरक्षेतेसाठी एकही रुपया प्रशासना मार्फत खर्च झालेला नाही.

वारंवार विनंती करूनही पर्यटन संस्थांच्या विनंती अर्जांना केराची टोपली दाखविण्याचे काम सोडून कुठलेही काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन झालेले नाही. जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर किनारपट्टी भागात दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत जाऊन आज दरवर्षी १० लाखापेशा जास्त पर्यटक स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा पर्यटनासाठी या भागास भेट देतात गेल्या २० वर्षांत सागरी पर्यटनासाठी देशविदेशातील करोडो पर्यटकांनी भेट दिली. त्यांना साहसी जलक्रीडा पर्यटन करण्याची यशस्वी जबाबदारी स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांनी आपल्या योग्य नियोजनाने व व्यावसायिक अंतर्गत उभारलेल्या लाईफगार्ड यंत्रणेद्वारे यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामुळेच २४ मे रोजी स्कुबा डायव्हिंग बोट अपघातामध्ये १८ लोकांना वाचविण्यात आले.

याउलट या दुर्घटनेमुळे दोन दशकापेक्षा जास्त काळानंतर अचानक जाग्या झालेल्या स्थनिक प्रशासनास खऱ्या अर्थाने पर्यटकांची सुरक्षेवर काम करायचे असल्यास जलक्रीडा संघटना, जलक्रीडा व्यावसायिक यांची त्वरित बैठक आयोजित करून या व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक लाईफगार्ड, वैद्यकीय सुविधा, रेस्क्यूटिम ,सागरी प्रशिक्षण, एक खिडकी यंत्रणा, व्यवसाय अधिकृत करण्यासंदर्भात सहकार्य होणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने स्थानिक प्रशासनाची मदत पर्यटकांस व स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांना होणारी आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी बाबा मोंडकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page