भूषण पोकळे:ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन ; पडेल ग्रामपंचायतीचा उपक्रम ठरतोय मार्गदर्शक..
⚡देवगड ता.२७-:
आजच्या स्पर्धात्मक युगात शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळायला हव्यात. योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास यांच्या जोरावर हे विद्यार्थी कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही पैलू पाडणारी ठरेल.” हा उपक्रम या शाळेत पुढील पूर्ण शैक्षणिक वर्षभर सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी केले.
पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, येथे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ आणि ‘नृत्य प्रशिक्षण’कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, प्रमुख मार्गदर्शिका रूपाली कदम मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी शमशुद्दीन साटविलकर आदी उपस्थिती होते..
यावेळी मुख्य मार्गदर्शिका रूपाली कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तसेच नृत्यासारख्या कला जोपासताना व्यक्तिमत्व विकास कसा साधता येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तर
ग्रामपंचायतीच्या या पुढाकाराचे पालक वर्गातूनही कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी मदत होणार असल्याचा विश्वास मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
