⚡बांदा ता.२८-: बांद्याच्या बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने झोळंबे येथील युवक सुनेश गवस याला उपचारासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने रोख रुपये २१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गवस कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुनेश गवस याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तो दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यासाठी त्याच्या आईने आपली एक किडनी देण्याचा निर्णयघेतला आहे. या शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची माहिती मिळताच मंडळाने तत्काळ पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे. गणेश मंडळाच्या वतीने ही मदत सुनेश गवस यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, अर्णव स्वार, जय भोसले तसेच खजिनदार विठ्ठल वाळके उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा हे मंडळ धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
फोटो:-
झोळंबे येथे सुनेश गवस व त्याच्या कुटुंबियांला याला आर्थिक मदत सुपूर्द करताना गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी.
किडनी प्रत्यारोपणासाठी सुनेश गवसला गणेशोत्सव मंडळाची २१ हजारांची मदत…
