⚡दोडामार्ग, ता.२८-: विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने मान. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रशिक्षण शिबिर दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर २४ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडले.
श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा, वंदूर (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात शाळेतील तसेच तालुक्यातील इतर अशा एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात लाठी-काठी, तलवारबाजी आणि आत्मसंरक्षण यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना पूरक आहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे, पालक गणेश ठाकूर, सोमनाथ नाईक, धाकू वरक तसेच मुख्याध्यापक संजय पाटील यांनी सहकार्य केले.
समारोप कार्यक्रमात पालक सोमनाथ नाईक यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा शाल, श्रीफळ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण प्रशिक्षण शिबिराचा आर्थिक भार संस्थेचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांनी उचलला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक युद्धकलेबद्दल जागरूकता निर्माण होऊन आत्मसंरक्षणाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
