मालवण ता.२८-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता ही नेहमीचीच समस्या बनली असताना मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अकरा महिन्यांसाठी असणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील हे उच्च शिक्षणासाठी ३१ मेपासून जात असल्याने त्यांच्या जागी अद्याप वैद्यकीय अधीक्षक म्हणून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
जिल्हा शल्य चिकित्सकाकडून नियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये डॉ. दत्ता रामराव केंद्रे आणि डॉ. अनुप गौतम पळसंबकर यांचा समावेश आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून मालवण ग्रामीण रुग्णालयात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना ७५ हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. ही नियुक्ती अकरा महिन्यांसाठी केली आहे. तर सध्या कार्यरत असणारे डॉ. प्रफुल्ल साळुंखे यांची मुदत संपत आहे. त्यांनी चांगल्याप्रकारे मालवणात काम केले असल्याने त्यांनाही पुढील अकरा महिन्यांसाठी मालवणातच नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्यापैकी दोन व्हेंटिलेटर मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिले आहेत. पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर अत्यवस्थ पर्यटकांसाठी व्हेंटिलेटर नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तातडीने दोन व्हेंटिलेटर ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध करून दिले आहेत.
