खासदार अनिल देसाई यांचा इशारा; सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा …
सावंतवाडी ता.२७-:* शिवसेना पक्षात शिस्त आणि ताकत आहे ही सांघिक ताकत दिल्लीश्वर ओळखून आहे, त्यामुळे आज केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काय वाट्टेल तो ससेमिरा लावा, मात्र दिवस मोजकेच आहेत, सत्ता निघून गेल्यावर गाठ मात्र शिवसेनेची आहे त्यावेळी तुमची काय अवस्था होईल हे लक्षात ठेवा असा गर्भित इशारा शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी भाजपाचे नाव न घेता आज येथे दिला.तर कोण काय म्हणत, काय करतो याकडे लक्ष देऊ नका येणार्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी हा शिवसेनेचाच असेल असा पण सर्वानी या अभियानाच्या माध्यमातून करा आणि कामाला लागा असे आवाहनही श्री देसाई यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिव संपर्क अभियान येथील रविंद्र मंगल कार्यालयात पार पडले यावेळी श्री देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर,जेष्ठ नेते अण्णा केसरकर,तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राजन पोकळे, विक्रांत सावंत, सागर नाणोसकर, रुची राऊत, जयेंद्र परुळेकर, जानवी सावंत, बाबुराव धुरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
