वेंगुर्ला ता.२३-:* महाराष्ट्र राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याला प्राप्त झालेला सन्मान हा सिंधुदुर्गवासियांना भूषणास्पद आहे, असे प्रतिपादन रस्सीखेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी होडावडा येथे केले.
राष्ट्रीय, राज्य रस्सीखेच संघटनेच्यावतीने पालघर मध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघाने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात होडावडा ग्रामस्थांच्यावतीने रस्सीखेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयपकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विजयी संघातील खेळाडूंचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी होडावडा सरपंच अदिती नाईक, उपसरपंच धावडे, संघटनेचे सचिव किशोर सोनसुरकर, संघटक बाळू कांडरकर, राजबा सावंत, पाडगावकर, नाईक, सावंत आदींसह अन्य मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा संघामध्ये होडावडा गावचे सर्वाधिक खेळाडू सहभागी होते. या विजयी संघामध्ये खेळाडू विदुल पावणोजी, सुदेश वालावलकर, ओंकार सोनसुरकर, सर्वेश साळगावकर, अनंत परब, अमोल पारधी, राजा मांजरेकर, विनय नाईक, रामा जाधव व सूरज साळगावकर आदींनी सहभाग घेत हे राज्यस्तरीय यश मिळविले. तर जयप्रकाश चमणकर, मनिष दळवी, किशोर सोनसुरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा वेळागर येथे राष्ट्रीय, राज्य रस्सीखेच संघटना,सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटना व शिरोडा वेळागर सर्व्हे नं.३९ मित्रमंडळ यांच्या वतीने दि.२७ ते ३० मे या कालावधीत राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धा होणार असून त्यामध्ये २७ राज्यांचे पुरुष व महिला संघ सहभागी होणार असल्याची माहिती चमणकर यांनी दिली.
