कोंडुरा येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
वेंगुर्ला प्रतिनिधी– वायंगणी-कोंडुरा येथील आमच्या माड बागायतीच्या जमीन मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे रस्ता काम व पूल बांधण्याच्या कामाला रितसर हरकत घेऊन सुद्धा बेधडकपणे झाडांचे नुकसान करून वावरणा-या बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ती समज देण्यात यावी अन्यथा प्रत्यक्ष जागेवर होणा-या दुष्परिणामास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ठेकेदार कंपनीच्या सर्वांना जबाबदार धरून त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे कोंडुरा येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील गाव मौजे तळेकरवाडी येथील सर्वे नं. ८९, हिस्सा नं. ३ व सर्वे नं. ८७, हिस्सा नं.१ या सामायिक जमीन मिळकती असून मच्छीमारी मोलमजुरी बरोबरच या माडबागायतीवरच आमचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. या जमिनीसंदर्भात आम्ही कुणालाही अखत्यारपत्र दिलेले नाही. तसेच आमच्या जमिनीतून रस्ता करण्यासंदर्भात अगर पुलाचे बांधकाम करण्याकरिता आम्ही कुणालाही बक्षीसपत्र अथवा खरेदीखताने आमच्या जमिनी दिलेल्या नाहीत व देणारही नाही असे असून सुद्धा काही धनदांडग्या लोकांच्या दडपशाहीने संबंधित कार्यालयाने संगनमत करून शासनाचा करोडो रुपये निधी वाया घालवून आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर नांगर फिरवून आमच्या जमिनी हडप करण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. सदर रस्त्यासाठी आम्ही कोणतीही मागणी केलेली नसताना सुद्धा धनदांडग्यांच्या मदतीने गैरफायदा घेऊन आमच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कोंडुरा येथील प्रशांत पेडणेकर, नारायण पेडणेकर, सुमित्रा पेडणेकर, सुरेखा नवार, सुचिता टेमकर यांनी सादर केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
शासनाने शेतक-यांच्या जमिनी परस्पर ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्यास तसे जाहीर करावे अन्यथा आमच्यासारख्या कोकणातील अन्य शेतक-यांना अशा प्रकारच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागणार आहे. आमच्या सामाईक जमीन मिळकतीमध्ये नियमबाह्य रस्ता करण्याचे काम हाती घेणार असल्याचे आम्हाला कळताच त्यासंदर्भात १७ डिसेंबर २०२१ रोजी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन सादर करुन सदर कामास आमची हरकत असल्या बाबत लेखी कळविले होते.
सी.आर.झेड विभागाची मान्यता मिळाली असल्याने आपले काही चालणार नाही असे सांगून आमची फसवणूक केली जात आहे. परंतु सी.आर.झेड विभागाला देखील आम्ही आमच्या जमिनीमध्ये रस्ता अगर पूल उभारणीकरिता कोणत्याही प्रकारे परवानगी दिलेली नाही त्यामुळे आम्हा जमीनदारांची दिशाभूल करण्याचे प्रकार कोणी करू नये असे सांगत आमच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वावरणा-या अधिकारी व कर्मचा-यांपासून आमच्या माड बागायतीमध्ये काम करणा-या आमच्या बायका मुलांना असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आमच्या सामायिक जमिन मिळकतीमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करून रस्त्याचे अगर पुलाचे काम करण्याचा प्रयत्न केला गेल्यास आमच्या बायका-मुलांसह आमच्या माड बागायतीमध्ये उतरून अतिक्रमण करणा-यांना जशास तसे उत्तर द्यावे लागणार आहे व यावेळी होणा-या परिणामास संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचा-यांसह ठेकेदार कंपनीच्या सर्वांना जबाबदार धरून त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोंडुरा येथील संतप्त झालेल्या अन्यायग्रस्त जमीनदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वेंगुर्ला तहसीलदार, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
