कुंभार समाजाची ताकद दाखविण्याची आता वेळ आली:सतीश दरेकर

कणकवली ता.२२-:* कुंभार समाजाची लोकसंख्या दाखविण्यासाठी संघटनेने जनगणनेचे काम हाती घेतले असून हे काम कुंभार बांधवांनी एकजुटीने पूर्ण करून समाजाची ताकद दाखवावी . कारण समाजाला ताकद दाखविण्याची आता वेळ आली आहे , असे प्रतिपादन कुंभार समाज सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी केले . संत गोराकुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने कुंभार समाज जिल्हा मेळावा कसाल हायस्कूल येथे आयोजित केला होता .

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री . दरेकर बोलत होते . यावेळी गोव्याचे आमदार प्रेमेंद्र शेट , जिल्हाध्यक्ष प्रा . गणपत शिरोडकर , शरद वाडेकर , तुळशीदास कुपेरकर , रामदास सांगवेकर , वसंतराव धोडनिधीकर , प्रकाश भालेराव , ज्ञानेश्वर सोमवंती , प्रकाश साळवी , यशवंत शेटुलकर , दीपक बुरवाडकर , सुभाष शेटकर , विलास गुडेकर , सौ . करुणा चिंदरकर , समीर शेटकर , अॅड . जयंत गुडेकर , बंडेरावर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते . श्री . दरेकर म्हणाले , कुंभार बांधवांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.

शासनाकडून कुंभार बांधवांना माती पुरविण्याची परवानगी देण्यात आली असून एप्रिल ते मे महिन्यात वर्षभरासाठी लागणारी माती उचलावी . तसेच बेरोजगारांचा प्रश्न रोजगार मेळावा घेऊन सोडवला जाणार आहे . संघटना चांगली काम करीत असून कुंभारसमाज आता पुढे जात आहे . महिलांना प्रतिनिधीत्व देऊन संघटनेला महिलांचा पाठिंबा मिळवावा .

त्यासाठी लवकरच महिला सक्षमीकरणाचे काम संघटनेमार्फत सुरु होणार आहे . समाज भवानासाठी चांगला आरखडा तयार करा , त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य लाभेल , अशी ग्वाही त्यांनी दिली . आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले , गोवा व सिंधुदुर्ग एक असून हे नाते टिकविण्याचे काम संघटना करीत आहे . गोव्यामध्ये कुंभार समाज अल्प असून कुंभार समाज गोव्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे . कुंभार बांधवांनी गोरोबा काकांचा आदर्श घ्यावा , असे आवाहन त्यांनी केले . यावेळी विलास गुडेकर , प्रकाश भालेराव , शरद वाडेकर यांनी विचार मांडले. आरंभी सतीश दरेकर यांच्या हस्ते संतश्रेष्ठ गोराकुंभार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .

त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . सतीश दरेकर यांच्या हस्ते तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . त्याचप्रमाणे शासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या कुंभारबांधवांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक प्रा . गणपत शिरोडकर यांनी केले . सूत्रसंचालन प्रा . नारायण साळवी यांनी केले . आभार दिलीप सांगवेकर यांनी मानले .

You cannot copy content of this page