आयुष्य सुखी व समाधानी बनवायचे असले उद्योग क्षेत्राकडे वळावे !

कणकवलीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली 21 मे (प्रतिनिधी)– उद्योग क्षेत्रात प्रगतीची संधी आहे या संधीचा लाभ कोकणातील तरुण तरुणींसह नवउद्योजकांनी घेतला पाहिजे . उद्योगांची वृद्धी करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उद्योग क्षेत्रात कोकणचा दबदबा निर्माण करावा . तरुण तरुणींना आपले स्वप्न महत्वाकांक्षा पूर्ण करत स्वतःचे आयुष्य सुखी व समाधानी बनवायचे असले उद्योग क्षेत्राकडे वळावे.जिल्ह्यातील तरुण तरुणींनी नोकरीच्या मागे लागता उद्योग सुरु करावेत . त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य लघु , मध्यम , सुक्ष्म उद्योग खात्यामार्फत केले जाईल , असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांनी केले . सिंधुदुर्गाचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी आपण प्रयत्न केले मात्र सिंधुदुर्गाच्या विकासात विरोधकांचे काहीच योगदान नसून त्यांनी साधी अंगणवाडी बांधलेली नाही , अशी टीका ना. राणे यांनी केली .

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने एमएसएमई विकास संस्थान मुंबईतर्फे कणकवली रेल्वे स्टेशन रोड , उपजिल्हा रुग्णालयासमोर सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २३ मेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे . महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले . यावेळी एमएसएमई विकास संस्थान मुंबईचे डायरेक्टर पी . एम . पार्लेवार , सहसंचालक राहूल मिश्रा , व्ही . आर . शिरसाट भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , सिंधुदुर्ग जिल्हा चेंबर ऑफ मिसचे कमलाकांत सावंत सावंतवाडी उद्यमनगर सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण काणेकर , डॉ . मिलिंद कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते . श्री राणे म्हणाले , बेरोजगारांनी सरकारी व खासगी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरु केला पाहिजे. उद्योग क्षेत्राला आता अच्छे दिन आले असून या क्षेत्रात नवनवीन संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत .

या संधीचा पुरेपुर लाभ युवा पिढीने उठवला पाहिजे लघू , मध्यम , सुक्ष्म स्वरुपातील उद्योग करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत . या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व सहकार्य माझ्या खात्यामार्फत दिले जाईल . ९० च्या दशकात सिंधुदुर्गाची ओळख ही मागासलेला जिल्हा म्हणून होती . आपण प्रथमच आमदार , मंत्री , मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देऊन जिल्ह्याचा विकास केला . देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग घोषित झाला . पर्यटनावर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी मी प्रयत्न केले .

जिल्ह्यावासीयांना चांगले जीवन जगता यावे यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करत इंजिनिअरींग कॉलेज , वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरु केल्याचे श्री . राणेनी सांगितले . श्री राणे म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकामध्ये उद्योग करण्याची क्षमता आहे , पण त्यांच्यामध्ये आत्मविश्वासची कमतरता आहे . ही कमतरता भरून काढण्यासाठी असे औद्योगिक महोत्सव उपयुक्त ठरणार आहेत कोकणात पिकणाऱ्या फळफळांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना जगात मोठी मागणी आहे . या पदार्थाना आम्ही मार्केट उपलब्ध करून देऊ .

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ अधिकारी आणले.२०० कोटीचे आधुनिक टेक्नॉलॉजी असलेले उद्योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा साठी मी मंजूर केले आहे असेही त्यांनी सांगितले. नोकरी हवी मग ती शिपाई पदाची असली तरी चालेल ही मानसिकता सोडा.डाळ,पिटी भात खाऊन समाधान मानू नका.देशात करोडो रुपयांची उलाढाल होते त्यात उद्योग क्षेत्रात तुम्ही कधीतरी असणार आहेत की नाही ? असा सवाल यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी युवकांना केला यावेळी कमलाकर सावंत , श्रीकृष्ण काणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवामुळे जिल्ह्यातील उद्योग विकासाचे नर्व पर्व सुरु झाले असून जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या मालाच्या दर्जेदार पॅकिंग होण्यासाठी याठिकाणी एक पॅकिंग सेंटर सुरु करावी , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव विविध बँकेच्या कर्ज मंजूर झालेल्या ३०७ जणांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आले . महोत्सवाला मोठ्या संख्येने नवउद्योजक व नागरिक उपस्थित होते .

You cannot copy content of this page