ओरोस ता.१९-:* २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी अवैधरित्या १३ चार चाकी बोलेरो वाहने खरेदी केल्याप्रकरणी काँग्रेसच्या तत्कालीन एकूण १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच वाहने जप्त करण्यात आली होती. हे प्रकरण त्यावेळी गाजले होते. दरम्यान, याचा निकाल मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांच्या न्यायालयात लागला असून सर्व संशयित आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संशयितांच्यावतीने वकील संग्राम देसाई, अविनाश परब व अष्पाक शेख यांनी काम पाहिले.
१५ फेब्रुवारी २०१४ ते २७ मार्च २०१४ या कालावधीत राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी संदीप भोसले (कणकवली), वसंत केसरकर (सावंतवाडी), मनीष दळवी (होडावडा), प्रकाश राणे (देवगड), प्रकाश मोर्ये (गोठोस), राजेंद्र निंबाळकर (कोनाळकट्टा), प्रज्ञा परब (वेंगुर्ला), सतीश सावंत (कलमठ), भालचंद्र कोळंबकर (मालवण), चंद्रकांत गावडे (इन्सुली), संदेश सावंत (कणकवली), पराशर कुडाळकर (भरड), दिगंबर पाटील (करूळ) या १३ संशयितांनी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने निलेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यासाठी व त्यांना निवडून आणण्यासाठी संदीप भोसले व अन्य १२ जणांनी गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सर्व गाड्या अवैद्यरित्या खरेदी करीत प्रचारासाठी वापरल्याचेही पुढे आले होते.
