मालवण ता.१५-:* मालवण नगरपरिषतर्फे दांडी बीच येथे आयोजित पर्यटन महोत्सव २०२२ मध्ये दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेली मालवण सुंदरी स्पर्धा लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत मुंबईची ऋतुजा राणे हिने आपल्या अदाकारी, सादरीकरण आणि संवाद कौशल्याच्या जोरावर मालवण सुंदरी चा किताब पटकाविला. तर रेडी येथील पूजा राणे द्वितीय आणि मालवण वायरी येथील तन्वी वेंगुर्लेकर तृतीय विजेती ठरली.
मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दांडी समुद्रकिनारी सुरू असलेल्या मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त शनिवारी रात्री मालवण सुंदरी स्पर्धा रंगली. मालवण, सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, रत्नागिरी अश्या विविध ठिकाणाहून आलेल्या १७ सुंदरी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. खासगी गाड्यांबरोबरच रेल्वेचे गावी येण्याचे तिकीट न मिळाल्याने मालवण सुंदरी’ स्पर्धेसाठी वडिलांच्या रिक्षाने आईसोबत मुंबईहून मालवण असा १६ तासांचा प्रवास करून आलेली आणि मूळ काळसे येथील ऋतुजा राणे हिचा स्पर्धेतील सहभाग लक्षवेधी ठरला. ऋतुजा हिने अदाकारी, रॅम्पवॉक, पोझ अशा विविध आघाड्यांवर सरस कामगिरी केली.
तसेच प्रश्नोत्तराच्या सत्रात अचूक उत्तरे देत, स्पर्धेसाठी केलेल्या रिक्षाच्या प्रवासाची माहिती देत आणि उत्तम संवादाने आपली छाप पाडली. या जोरावरच तिने विजेतेपद पटकावित मालवण सुंदरी बनण्याचा मान मिळवला. तर रेडी येथील पूजा राणे व वायरी मालवण येथील तन्वी वेंगुर्लेकर यांनी सादरीकरणाबरोबरच आपल्या वक्तृत्व व बुद्धीची छाप पाडत उपविजेतेपद मिळविले. तर बेस्ट कॅटवॉक : पूजा महादळकर, बेस्ट स्माईल : मैथिली राणे, बेस्ट हेअर : नंदिनी बिले, बेस्ट फोटोजेनिक : जानव्ही श्रीनाथ, बेस्ट पर्सनॅलिटी: समिधा कुबल, यासह सर्वोत्कृष्ट वेशभूषा किताबाने पूजा राणे यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत खरी रंगत प्रश्नोत्तराच्या सत्रात आली. परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांवर काही स्पर्धकांची भंबेरी उडाली तर काहींनी दिलेल्या विचित्र उत्तरांनी एकच हास्यकल्लोळ उडाला.
या स्पर्धेचे निवेदन प्रसिद्ध वृत्त निवेदक ऋषी देसाई यांनी करत स्पर्धेत अधिकच रंगत आणली. या स्पर्धेस आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली. स्पर्धेचे परीक्षण प्रभू मॅडम व प्रणय तेली यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, सौ. जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सौ. स्मृती कांदळगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात खास आग्रहास्तव माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सादर केलेली “पहला पहला प्यार है…. मुसफिर हो यारो” या गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
