वराडकर हायस्कुल मुख्याध्यापक कांबळे यांचे निधन

अकाली निधनामुळे कट्टा पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर

ओरोस-:मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कुल कट्टाचे मुख्याध्यापक नंदकुमार कृष्णा कांबळे (सध्या राहणार सिंधुदुर्गनगरी नवनगर वसाहत) यांचे आज सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. सायंकाळी उशिरा कोल्हापूर जिल्ह्यातील चिमणे गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशेष म्हणजे ३१ मे २०२२ रोजी मुख्याध्यापक कांबळे हे सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळ, कट्टा दशक्रोशी, त्यांचे माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, तसेच सध्या ते राहत असलेल्या सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण रहिवाशांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वराडकर हायस्कुल कट्टा मध्ये ते मराठी व इतिहास विषयाचे शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांना मुख्याध्यापक पदी बढती मिळाली होती. सध्या ते या पदावर कार्यरत होते. गुरुवारी त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, तब्बेत अधिक बिघडल्याने आज त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येत होते. वाटेत तब्बेत अधिक बिघडल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुख्याध्यापक कांबळे हे मराठी विषयाचे गाडे अभ्यासक होते. दरम्यान, चिमणे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी, शिक्षक व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

You cannot copy content of this page