मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांचे आश्वासन
वेंगुर्ला ता.१३-:* कंत्राटी कामगारांबाबत स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली असून यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर येत्या काही कालावधीत सफाई कर्मचा-यांना कामावर हजर करुन घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी डॉ.अमिकुमार सोंडगे यांनी दिले.
दि.२ मे २०२२ रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेने कंत्राटी कर्मचा-यांना टेंडर संपल्याने अचानक सफाई व इतर कर्मचा-यांना काम बंद करण्यास सांगितले. त्यामुळे सफाई कर्मचा-यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात जे सफाई कामगार स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सदस्य होते,
त्यांची बाजू उचलून धरुन युनियनने वेंगुर्ला नगरपरिषदेशी पत्रव्यवहार व चर्चा केली. यातून मार्ग काढण्यात यश मिळाले आहे. कर्मचारी संघटनेने व वेंगुर्ला नगरपरिषदेने हा प्रश्न ताणून न धरता सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी सर्व मुद्दयांवर चर्चा केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष वामन कांबळे, सल्लागार वाय.जी.कदम, सदस्य पुंडलिक जाधव, अक्षय तेरेखोलकर, महिला प्रतिनिधी शुभांगी जाधव-नांदगांवकर, मेघा जाधव, सीमा जाधव हे उपस्थित होते. झालेल्या चर्चेत संघटनेनेही प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याचे तर येत्या काही दिवसात सफाई कर्मचा-यांना कामावर हजर करुन घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी डॉ.अमिकुमार सोंडगे यांनी युनियनला दिले.
