मालवण ता.०९-:* महाराष्ट्र शिक्षक पँनल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण दांडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. शिवराज सावंत व वैभववाडी कोकीसरे नारकरवाडी विद्यामंदिरच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती संपदा बागी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पँनल हा सुमारे पंचवीस हजार शिक्षकांशी संपर्क जोडणी असलेला तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांचा राज्यस्तरीय समुह आहे. या समुहामार्फत विद्यार्थी उपक्रमांसह दरवर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराचे आयोजन केले जाते. या करीता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उपक्रमशील कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांची निवड सदर समुहामार्फत करण्यात येते.
सिंधुदुर्ग मधून यावर्षी मालवण दांडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत यांची निवड झाली आहे,गेली ३० वर्षे आपल्या सेवाकालात श्री.शिवराज सावंत यांनी अनेक उपक्रम,नवोपक्रम आपल्या शाळेत राबविले असून बालचित्रवाणी पुणे मार्फत त्यांचे पाच शैक्षणिक पाठ सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित झाले आहेत, विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांच्या शैक्षणिक साहित्याची पाचवेळा राज्यस्तरीय निवड झाली आहे. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सावंत यांना प्राप्त आहेत.
त्याचप्रमाणे वैभववाडी विद्यामंदिर कोकीसरे नारकरवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.संपदा बागी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला असून आपल्या २० वर्षाच्या सेवाकालात त्यांनी अनेक उपक्रमात यशस्वी सहभाग नोंदविला आहे, सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर त्यांची दोनवेळा मुलाखत प्रसारित झाली आहे. त्यांना रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई तर्फे द्रोणाचार्य पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, शिक्षण माझा वसा।राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. सावंत व संपदा बागी यांचे सर्व स्तरातून कौतु होत आहे. महाराष्ट्र शिक्षक पँनलचा राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार वितरण सोहळा दि.१५ मे २०२२ रोजी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे होणार आहे.
